व्याजाचे आमिष दाखवून सेवा निवृत्त शिक्षकाला 58 लाखांचा गंडा

डुप्लीकेट पावत्या देऊन फसवणूक, आरोपी फरार

0

विवेक तोटेवार, वणी: गणेशपूर येथील एका सेवानिवृत्त शिक्षकाला व्याजाचे आमिश दाखवून 58 लाख रुपयांची टोपी घातल्याचे समोर आले आहे. फिर्यादी शिक्षकाच्या तक्रारीवरून वणी पोलिसात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. आरोपी अद्यापही फरार आहे. 

सविस्तर वृत्त असे की, आनंदराव हरबाजी बोढाले (79)  रा. गणेशपूर हे सेवानिवृत्त शिक्षक आहेत. यांना आपल्या मालकीची शेती विकून 2 कोटी रुपये मिळाले. त्यांनी आपल्या तीन मुलींना 60, 60 लाख रुपये देऊन 20 लाख रुपये आपल्या जवळ ठेवले. ते रोज वणीतील प्रगती नगर येथील प्रजापती ब्रह्माकुमारी पाठशाळा येथे ध्यान करण्यासाठी जात होते.

यादरम्यान त्यांची ओळख कन्हैयाकुमार देवनारायण राम रा. नेगुसराय, ता. कमलपुर जिल्हा चांदेली उत्तर प्रदेश यांच्यासोबत झाली. गप्पा मारीत ओळख झाली व कन्हैयाचे आनंदराव यांच्या घरी येणेजाणे सुरू झाले.

आनंदराव यांनी शेती विकून आपल्याला 2 करोड रुपये असल्याचे सांगितले. व आपल्या जवळ 20 लाख असल्याचे बोलून दाखविले. कन्हैया यांनी कोल इंडिया सोसायटी मध्ये गुंतवणूक केल्यास 14 टक्के व्याजाने पैसे मिळतात अशी बतावणी केली. आनंदराव यांनी 12 जुलै 2019 विश्वास ठेवून 8 लाख रुपये दिले. कन्हैय्या याने आनंदरावांना कोल इंडियाची पैसे भरल्याची पावती आणून दिली. त्यानंतर आनंदराव यांनी व त्यांच्या मुलींनी वेळोवेळी पैसे टाकले. याच्या डुप्लिकेट पावत्या हा कन्हैया आणून देत गेला.

काही दिवसानंतर आनंदराव यांना याबाबत संशय आला व त्यांनी पैसे परत मागितले. कन्हैया यांनी 10 दिवसात पैसे परत करतो म्हणून सांगितले. पण तो टाळाटाळ करीत होता. आनंदराव हे तो राहत असलेल्या मेघदूत कॉलनीच्या घरी गेले. यावेळी कन्हैया त्या ठिकाणी नव्हता. यावेळी त्याचा भाऊ घरी होता. त्याने सांगितले की कन्हैया हा गावाला गेला आहे. लॉकडाऊन असल्याने तो आता परत येऊ शकत नाही. लोकडॉउन संपताच तो येईल.

आनंदराव यांनी कन्हैया याचा फोन लावून बघितला परंतु तो बंद येत होता. आनंदराव यांना फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी वणी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून वणी पोलिसात कन्हैयाराम यांच्याविरुद्ध कलम 406, 420, 468, 471 नुसार गुन्हा नोंद केला आहे. घटनेचा पुढील तपास वणी पोलीस करीत आहे.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Leave A Reply

Your email address will not be published.