जुणोनी येथे कु-हाडीने वार करून पत्नीची हत्या

कुटुंब नियोजनाच्या ऑपरेशनवरून झाला पती पत्नीत वाद

0

सुशील ओझा: तालुक्यातील जुणोनी येथे पतीने पत्नीची कु-हाडीने निर्घृण हत्या केल्याची घटना मंगळवारी दिनांक 9 फेब्रुवारी दुपारी 2.30 ते 3 वाजताच्या दरम्यान घडली. यात पत्नी जागीच ठार झाली. सिद्धार्थ बिरबल पुसाटे (35) असे आरोपी पतीचे नाव आहे. आरोपीला मुकुटबन पोलिसांनी अटक केली आहे. पती पत्नीत नेहमी छोट्या मोठ्या कारणांवरून वाद व्हायचे. ही हत्याही केवळ शुल्लक कौटुंबीक वादातून झाल्याचे समोर आले आहे.

सविस्तर वृत्त असे की आरोपी सिद्धार्थ बिरबल पुसाटे (35) हा जुणोनी गावातील रहिवाशी आहे. आरोपी हा त्याची पत्नी रिया उर्फ सरस्वती (30) दोन मुली व वडिलांसह राहतो. त्याला एक अडीच वर्षांची तर दुसरी 4 महिन्याची मुलगी आहे. रियाला कुटुंब नियोजनाचे ऑपरेशन करायचे होते. दुपारी तिने याबाबत पतीशी बोलून दाखवले व मुलींचा जन्मदाखल मागितला. त्यावर पतीने मुलीचा जन्म यवतमाळला झाला असल्याने तिथून आणावे लागेल व सध्या पैसे नसल्याने यवतमाळला जाऊन दाखला आणणे शक्य नसल्याचे स्पष्ट केले.

पतीने नकार दिल्याने रागाच्या भरात रियाने पती सिद्धार्थच्या दोन थोबाडीत लावल्या. त्यावरून पतीने चिडून पत्नीला ढकलून खाली पायरीवर पाडले व स्वयंपाक घरातील कु-हाड आणली. त्याने पत्नीच्या डोक्यावर कु-हाडीने वार केले. या हल्ल्यात रियाच्या डोक्याच्या मागील बाजूस गंभीर इजा होऊन रक्तस्राव झाला. त्यातच ती जागी ठार झाली.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

याबाबत गावातील पोलीस पाटील यांनी तक्रार नोंदवली असून आरोपी सिद्धार्थ बिरबल पुसाटे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीला अटक करण्यात आली आहे. घटनेचा पुढील तपास ठाणेदार धर्मा सोनुले यांच्या मार्गदर्शनात मुकुटबन पोलीस करीत आहे.

हे देखील  वाचा: 

व्याजाचे आमिष दाखवून सेवा निवृत्त शिक्षकाला 58 लाखांचा गंडा

कलाकाराची अंगावर थिनरने पेटवून आत्महत्या

Leave A Reply

Your email address will not be published.