खुशखबर: कापसाला सोन्याचा भाव, आज वणीत 9,500 रुपये दर

10 हजारांचा दर पार करण्याची शक्यता

जितेंद्र कोठारी, वणी: यंदा कापसाच्या उत्पादनात घट आलेली असतानाच दरात मात्र झळाळी आलेली आहे. रुईची दरवाढ होत असल्याने यंदा कापूस 10 हजार रुपये प्रति क्विंटल पार करण्याची शक्यता आहे. मंगळवारी वणी बाजार समितीत कापूस 9 हजार 500 रुपये प्रति क्विंटलच्या भावाने खरेदी करण्यात आले. त्यामुळे कापूस उत्पादक शेतकरीवर्गात आनंदाचे वातावरण आहे. मात्र दरवाढीच्या आशेमुळे शेतकरीदेखील कापसाची साठवणूक करीत असल्याने बाजारात कापसाची आवक मंदावली आहे.

लाँग स्टेपलच्या कापसाला यंदा 6025 रुपये क्विंटल हमी भाव जाहीर करण्यात आलेला आहे. परंतु हंगामाचे सुरुवातीपासूनच कापसाला हमीभावपेक्षा जास्त दर मिळत आहे. खासगी खरेदी क्षेत्रात जास्त भाव असल्यामुळे यंदा पणन महासंघ व सीसीआयने वणी येथे कापूस खरेदी केंद्र उघडले नाही. 31 डिसेंम्बर 2021 पर्यंत वणी बाजार समितीत कापसाचे दर 9 हजार रुपये प्रति क्विंटल पोहोचले होते. तर 2 जानेवारीला 9200 आणि 4 जानेवारीला 9500 रुपये दराने कापूस खरेदी करण्यात आला.

यवतमाळ जिल्ह्यात वणी विभाग सर्वाधिक कापूस उत्पादक क्षेत्र म्हणून प्रख्यात आहे. सहकारी व खाजगी बाजार समितीच्या माध्यमातून शेतकरी कापसाची विक्री करतात. वणी येथे 10 जिनिंग प्रेसिंग युनिट आहे. 31 डिसेंबरच्या पूर्वी वणी बाजारात दररोज 10 ते 12 हजार क्विंटल कापसाची आवक होती. मात्र भाववाढच्या प्रतीक्षेत शेतकऱ्यांनी कापूस विक्रीवर ब्रेक लावले आहे. सद्यस्थितीत वणी बाजारात 4 ते 5 हजार क्विंटल कापूसची आवक आहे.

स्टॉक फोटो

10 हजारांपर्यंत दर जाण्याची शक्यता: विनोद मुथा
गेल्या 3 दिवसात कापसाच्या भावात 500 रुपयांनी वाढ झाली आहे. त्यामुळे वणी विभागातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांना आणखी भाववाढीची आशा आहे. कापसाच्या उत्पादनात कमी आणि आंतरराष्ट्रीय बाजारात रुईची मागणी असल्याने कापसाचे दर 10 हजार रुपये पर्यंत जाण्याची शक्यता या क्षेत्रातील तज्त्र वर्तवत आहे.
– विनोद मुथा : कापूस खरेदीदार, वणी

हे देखील वाचा:

हरबरा कटर मशिन अवघ्या 280 रुपयांमध्ये

Comments are closed.