देमाडदेवी येथील कृष्णाच्या मदतीकरिता सरसावले लोकांचे हात
अनेकांनी फोन करून दर्शवली मदतीची तयारी
सुशील ओझा, झरी: तालुक्यातील अतिदुर्गम आदिवासीबहुल तालुक्यातील देमाडदेवी येथील अत्यंत गरीब भराडी समाजातील विद्यार्थी कृष्णा बाजीराव शिंदे हा बारावी कला शाखेतून 83:00% घेऊन उत्तीर्ण झाला. त्याची स्वप्न मोठा अधिकारी बनून गोरगरीब जनतेच्या सेवेत सदैव काम करण्याची इछा आहे. परंतु गरिबी परिस्थितीमुळे त्याचे स्वप्न भंगणार का असा प्रश्न उपस्थित झाला होता.
अशा होतकरू, हुशार व गरजू विद्यार्थ्यांकरिता आजही मदत करणारे दानशूर अजूनही या समाजात असल्याचे पहायला मिळाले. ‘वणी बहुगुणी’त बातमी प्रकाशित होताच, त्याची दखल घेण्यात आली. वणीतील विदर्भ राज्य आंदोलन समितीचे जिल्हा संघटक तथा मदूरभाव इंटरप्राइजेस चे संचालक राजू पिंपळकर व त्यांच्या पत्नी यांनी प्रतिनिधी सुशील ओझा यांच्याजवळ मदतीची गोष्ट बोलून दाखविली.
त्यानुसार कृष्णा शिंदे याची एडमिशन नागपूरला करून शिक्षणाचा, जेवणाचा आणि राहण्याचा तसेच शिक्षणाकरिता लागणारा इतर सर्व खर्च करण्याची जबाबदारी स्वीकारण्याची तयारी दर्शवत लहान भावासारखे त्याला शिकविण्याची जवाबदारी घेण्याची ग्वाही दिली. पाटणबोरी येथील रेड्डी हायस्कूलचे संचालक सुरेशरेड्डी यांनीसुद्धा कृष्णा याच्या शिक्षणापासून सर्वच जवाबदाऱ्या घेऊन त्याचे मोठे अधिकारी बनण्याचे स्वप्न पूर्ण करण्याची ग्वाही दिली. तसेच मुळचे वणीचे असलेले व मुंबई येथे स्थायिक असलेले वणी बहुगुणीचे वाचक असलेले अभय नगाटे यांनी देखील कृष्णाच्या शिक्षणासाठी आवश्यक ती मदत करण्याची तयारी दर्शवली.
कृष्णा यांच्या घरची अत्यन्त बिकट हलाखीची आहे. वडील दारोदारी भिक्षुकाचे काम करून आई शेतावर मोलमजुरी करून पोटाची खडगी कशी बशी भरत आपलं जीवन काढत आहे. मुलगा कृष्णा याला पुढील शिक्षण देऊन कसे द्यायचे स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून मोठा अधिकारी होण्याचं त्याच स्वप्न कसे पूर्ण करायचे, असा प्रश्न पडला होता.
याव्यतिरिक्त मुकुटबनयेथील आश्रमशाळेचे सचिव गणेश उदकवार यांनीसुद्धा जी मदत लागेल ती करण्यास तयार असल्याचे सांगितले. तसेच तालुक्यातील इतरही सामाजिक कार्यकर्ते व मित्रमंडळी आपापल्या परीने मदतीकरिता धावपळ करीत आहे.
कृष्णकरिता एवढे हात मदतीकरिता पुढे आले आहेत, की त्याचे उज्वल भविष्याचा निर्णय घेण्याची वेळ आली. कृष्णाचे मुख्याध्यापक शिक्षक किंवा त्यांच्याजवळची मित्रमंडळी यांनी योग्य निर्णय घेऊन त्याला पुढच्या शिक्षणाकरिता पाठवावे, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
वणी बहुगुणी इम्पॅक्ट
कृष्णा शिंदे यांच्या शिक्षणाकरिता तसेच त्याला मदत होऊन त्याचे भविष्य उज्ज्वल व्हावे याकरिता वणी बहुगुणीने पुढाकार घेऊन समाजातील जागृत व दानशूर लोकांकडून मदत व्हावी या उद्देशाने बातमी प्रकाशित केली. या बातमीमुळे वणी मारेगाव, झरी, पांढरकवडा व इतर तालुका व गावांतील शेकडो मदत करणाऱ्या व्यक्तीचे फोन व संदेश आलेत. या सत्कार्याने कृष्णा यांचे भविष्य उज्वल होणार व तो मोठा अधिकारी बनण्याचे सुद्धा स्वप्न पूर्ण होण्याचे चिन्ह दिसत आहे. वणी बहुगुणीच्या लिखाणामुळे कृष्णाकरिता शेकडो हात मदतीकरिता समोर आले नि येत आहेत. त्याकरिता कृष्णाने ‘वणी बहुगुणी’चे आभार मानलेत.