गोठ्यातून ओढत नेत वाघाने पाडला गाईचा फडशा

भास्कर राऊत, मारेगाव: मारेगाव तालुक्यातील शिवनाळा येथील शेत शिवारात वाघाने हल्ला करून गाईचा फडशा पाडला. आज शनिवारी सकाळी ही घटना उघडकीस आली. शिवनाळा परिसरात पुन्हा वाघाने एंट्री केल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान वनविभागाने मोहफूल गोळा करणा-या मजुरांना सावधतेचा इशारा दिला आहे.

कान्हू लेतु आत्राम रा. शिवनाळा यांचे गावालगतच शेत आहे. त्यांच्याकडे 12 एकर शेती आहे. सध्या उन्हाळ्याला सुरुवात झाली आहे. त्यामुळे गावातील अनेकांनी आपली जनावरे शेतातल्या गोठ्यात बांधण्यास सुरुवात केली आहे. कान्हू आत्राम यांनी देखील शुक्रवारी दिनांक 3 मार्च 2023 रोजी संध्याकाळी आपले जनावरे शेतातील गोठ्यात बांधले व ते घरी निघून गेले.

रात्रीच्या सुमारास शेतात वाघाने एन्ट्री केली. वाघाने गोठ्यातून गायीला ओढत नेऊन गायीची शिकार केली. आज शनिवारी दिनांक 4 मार्च राजी आत्राम हे नेहमीप्रमाणे शेतात गेले असता ही घटना उघडकीस आली. गोठ्याच्या काही अंतरावर त्यांना गाय मृत अवस्थेत आढळली. शिवाय गायीवर हल्ला केल्याच्या खुणा आढळल्या.

घटना उघडकीस येताच मालकाने त्वरीत वन विभागाला घटनेच्या संदर्भात माहिती दिली. वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी येवुन पंचनामा सुरू आहे. गाईचा वाघाने पडशा पडल्याने शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले आहे. परिसरात पुन्हा वाघाचे आगमन झाल्याने वन विभागाने त्वरित वाघाचा बंदोबस्त करावा अशी अपेक्षा परिसरातील नागरिक व्यक्त करीत आहे.

नागरिकांना सावधतेचा वनविभागाचा इशारा
शिवणाळा परीसरात वाघाचा वावर आहे. या परिसरात असलेल्या जंगलात अनेक लोक मोहफूल गोळा करण्यासाठी जात असतात. मोहफूल गोळा करण्यासाठी सकाळी लवकर जावू नये, त्यामुळे वन्य प्राण्यांच्या हल्ल्याचा धोका असतो. मोहफूल गोळा करण्यासाठी गेले असता खालची जागा झाडून स्वच्छ करावी. जागा स्वच्छ करण्यासाठी आग आग लावू नये. असे आवाहन शंकर ग. हटकर वनपरिक्षेत्र अधिकारी मारेगाव यांच्या तर्फे करण्यात आले आहे.

Comments are closed.