तो झाडावर चढल्यावरही वाघाने त्याला ओढून खाली आणले

मांडवी परिसरात चालला वाघाचा थरार, दोघे जखमी

0

सुशील ओझा, झरी: झरी वनपरिक्षेत्र अधिकारी कार्यालयांतर्गत येणाऱ्या मांडवी बीट येथे आज वाघाने जीवघेणा हल्ला केला. यामध्ये एक जण गंभीर जखमी झाला, असून दुसरा थोडक्यात बचावला आहे. हा प्रसंग इतका थरारक होता की सहका-यावर हल्ला झाल्याने दुसरा व्यक्ती झाडावर चढला तर वाघाने त्याला पाय ओढून खाली आणले. मात्र दैव बलवत्तर असल्याने या दोघांचाही या जीवघेण्या हल्यातून जीव वाचला. यातील एकाची परिस्थिती गंभीर आहे.  

सविस्तर वृत्त असे की सुधाकर रामभाऊ मेश्राम (35) ,रामकृष्ण कानू टेकाम (22) हे दोघेही बेलमपल्ली येथील रहिवाशी आहेत. ते दोघेही आज नेहमीप्रमाणे शेतात कडब्याची गंजी मारून बैलाला पाणी पाजायला जुनोनी शिवारातील चाटवण या नाल्यावर गेले. मात्र त्या परिसरात वाघा आला होता. बैलाला वाघाची चाहूल लागली व बैलांनी धूम ठोकली. मात्र वाघाने अचानक या दोघांवर हल्ला चढविला.

या हल्ल्यात वाघाने सुधाकर याची मान तोंडाने पकडून त्याला दूर नेण्याचा प्रयत्न केला. वाघाने सुधाकरच्या मांड्या, पाय, पोट-या, हाता व पायाला पकडले. यात सुधाकर गंभीर जखमी झाला. सुधाकर याने वाघाचा प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला. वाघाने सहका-यावर हल्ला केल्याने त्याच्या सोबत असलेला रामकृष्ण झाडावर चढला. मात्र दुसरा व्यक्ती झाडावर चढताना दिसताच वाघाने झाडाकडे धाव घेतली व रामकृष्णच्या पायाला पकडले व त्याला खाली ओढले. या झटापटीत त्याच्या पायाची बोटे पूर्णपणे कुरतडली गेली आहे.

या हल्यात रामकृष्णची शक्ती कमी पडली. वाघ त्याला झाडावरून खाली खेचण्यात यशस्वी ठरला. मात्र रामकृष्णने प्रसांगवधान राखून जोराजोरात आरडाओरड केला. दरम्यान परिसरातूनच काही शेतकरी बैलगाडी घेऊन बैलास पाणी पाजण्यास नाल्यावर येत होते. त्यांनी आवाज ऐकताच ते आवाजाच्या दिशेने तात्काळ गेले. तिथे त्यांना वाघ दिसताच त्यांनी आरडाओरड केला. आरडाओरड केल्याने वाघ तिथून निघून गेला.

मात्र या झटापटीत सुधाकर गंभीर जखमी झाला तर रामकृष्णच्या पायाला मार लागला. सुदैवाने दोघांचे प्राण वाचले. शिवारातच काम करत असलेला राजू मेश्राम आणि सुनील मेश्राम या दोघांनी त्या दोघांना बैलगाडीत बसवून मांडवीगावा पर्यंत आणले व वनविभागाला सुचित केले.

वनविभागाने गाडी आणली व दोन्ही जखमींना प्रथम पांढरकवडा येथे नेले. मात्र पांढरकवडा येथून त्यांना जखम गंभीर असल्याने सरकारी रुग्णालय यवतमाळ येथे रेफर करण्यात आले. यापूर्वीसुद्धा वाघांने दोघावर हल्ला केला होता. ते दोघेही मांडवी येथीलच रहिवाशी होते. मांडवी परिसरात पाच वाघाचे वास्तव्य असून सुमारे एक ते दीड वर्षापासून वाघाचे दर्शन परिसरातील नागरिकांना होत आहे. सद्यस्थितीत मशागतीची कामे सुरू असून शेतकरी शेतात वखरणीचे कामे करीत आहे. त्यामुळे शेतक-यांमध्ये दहशत पसरली आहे.

शेतक-यांनी काळजी घ्यावी – एसबी मेहरे
वनविभागाच्या दैनंदिन निरीक्षणानुसार मांडवी बीडतील कंपार्टमेंट नंबर 59 येथे पाच वाघांचे अस्तित्व आहे. हे वाघ कुत्रिम पाणवठ्यावर दिसून येतात. सदर वाघ हा शिकारीच्या शोधात जंगलाबाहेर आला असावा. कापूस वेचणीच्या वेळी शेतकऱ्यांना व शेतमजुरांचे संरक्षण देण्यात आले होते. मात्र आता शेतीची कामे नाही. शेतकऱ्यांनी स्वतःची काळजी घेऊन शेतीची कामे करावी.
: एसबी मेहरे, रेंजर

हे देखील वाचा:

अत्यावश्यक सेवेत नसणा-या एकल दुकानांना परवानगी

तालुक्याला महिन्याभरानंतर मोठा दिलासा: आज एकही रुग्ण नाही

Leave A Reply

Your email address will not be published.