मांगरुळजवळ ट्रकची शेतक-याला धडक, शेतक-याचा मृत्यू

भास्कर राऊत, मारेगाव: वणी रोडवर मांगरुळजवळ एका ट्रकने शेतक-याला धडक दिली. मंगळवारी रात्री 9.30 वाजताच्या सुमारास हा अपघात झाला. या अपघातात शेतकरी गंभीर जखमी झाला होता. त्याला उपचारासाठी चंद्रपूर येथे हलवण्यात आले होते. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. सुरेश विश्वनाथ पारखी (40) असे मृत शेतक-याचे नाव असून ते मारेगाव येथील रहिवासी होते. अपघातानंतर ट्रकचालकाचे नियंत्रण सुटून ट्रक पलटी झाला.

सुरेश विश्वनाथ पारखी हे रात्री 9 ते 9.30 वाजताच्या सुमारास मांगरुळ रस्त्यालगत असलेल्या शेतातून मारेगाव येथे पायदळ येत होते. त्याच वेळी वणीकडून यवतमाळच्या दिशने एक ट्रक (MH34 BJ0046) जात होता. दरम्यान ट्रक चालकाने सुरेश पारखी यांना मागून जबर धडक दिली. अपघातामुळे ट्रकचालकाचे ट्रकवरील नियंत्रण सुटले व ट्रक देखील रस्त्याच्या बाजूला जाऊन पलटी झाला.

या अपघातात सुरेश पारखी हे गंभीर जखमी झाले. अपघात होताच ट्रकचालक घाबरला व तो घटनास्थळावरून पसार झाला. अपघाताची माहिती मिळताच मांगरुळ, रस्त्यावरून जाणा-या नागरिकांनी ऍम्बुलन्स बोलावली व जखमींच्या नातेवाईकांना याची माहिती दिली. सुरेश यांना आधी मारेगाव येथे उपचारासाठी नेण्यात आले. मात्र त्यांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना चंद्रपूर येथे उपचासाठी रेफर करण्यात आले.

चंद्रपूर येथे उपचार सुरू असताना मध्यरात्रीच्या सुमारास सुरेश पारखी यांची प्राणज्योत मालवली. सुरेश यांच्या पश्चात आई-वडील, पत्नी व दहा वर्षाचा एक मुलगा आहे. घटनेचा तपास मारेगाव पोलीस करीत आहे.

Comments are closed.