वणी येथील ‘अभिनयन’ सुखरुप परतणार मायदेशी

युक्रेनमधून भारतीय नागरिकांना परत आणण्यासाठी 'ऑपरेशन गंगा' सुरु

जितेंद्र कोठारी,वणी: युद्धग्रस्त युक्रेन देशात  अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांना सुखरूप मायदेशी परत आणण्यासाठी केंद्र सरकार सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. ऑपरेशन गंगा मोहीम अंतर्गत मागील दोन दिवसात 469 विद्यार्थ्यांना युक्रेनमधून परत आणण्यात आले आहे. वणी येथील अभिनयन काळे हा विद्यार्थीही युक्रेनमध्ये अडकला असून लवकरच मायदेशी परतणार आहे.

वणी येथील अभिनयन राम काळे हा विद्यार्थी MBBS शिक्षण घेण्यासाठी एका महिन्यांपूर्वीच युक्रेन येथे गेला होता. परंतु रशिया आणि युक्रेन मध्ये भडकलेल्या युद्दामूळे इतर विद्यार्थ्यांसह अभिनयनही अडकला आहे. रशिया आणि युक्रेनमध्ये तणावाचे वातावरण बघता अभिनयन काळे यांनी भारतात परत येण्यासाठी 1 मार्च रोजीचे विमानाचे तिकीट बुक केले होते. परंतु 23 फेब्रुवारी पासून दोन्ही देशांमध्ये भीषण लढाई सुरू झाली. त्यामुळे युक्रेनमधून सर्व विमानसेवा बंद करण्यात आली.

युद्धग्रस्त युक्रेन देशातून तब्बल 16 हजार भारतीय नागरिकांना मायदेशी परत आणण्यासाठी केंद्र सरकार ‘ऑपरेशन गंगा’ मोहीम राबवित आहे. या मोहिमेअंतर्गत शनिवार 26 फेब्रु. रोजी रात्री 219 नागरिक तर रविवार 27 फेब्रु. रोजी पहाटे 250 नागरिकांना एअर इंडियाच्या विमानाने सुखरूप परत आणण्यात आले आहे. वणी येथील विद्यार्थी अभिनयन काळे हा आज रोमानियाकडे निघाला असून रविवारी रात्री किंवा सोमवारी सकाळी मुंबई विमानतळावर पोहचण्याची शक्यता आहे.  युक्रेन मध्ये राहणाऱ्या 16 हजार भारतीय नागरिकांपैकी 14 हजार नागरिक हे विद्यार्थी आहे. हे सर्व विद्यार्थी युक्रेनमध्ये वैधकीय शिक्षणासाठी गेले होते. 

वैद्यकीय शिक्षणासाठी युक्रेनच का?

भारताच्या तुलनेत युक्रेनमध्ये वैद्यकीय शिक्षण स्वस्त आहेत. भारतात खासगी शिक्षण संस्थेत एका विद्यार्थ्याच्या वैद्यकीय शिक्षणाचा खर्च एक कोटी रुपयांच्या घरात आहे. तर युक्रेनमध्ये 6 वर्षांच्या वैद्यकीय शिक्षणाचा खर्च हा 22 ते 25 लाख रुपये इतका आहे. सिवाय युक्रेनमधील एमबीबीएस पदवीला जगभरात मान्यता आहे.

Comments are closed.