बहुगुणी डेस्क, वणी: लग्न जुळलं, साक्षगंधही पार पडला… स्वप्नातल्या संसाराची पायाभरणी झाली… मात्र असे वाटत असतानाच अचानक मुलगा अडून बसला. “लग्न AC हॉलमध्येच करा आणि तेही थाटामाटात!” अशी मागणी केली. मुलीच्या कुटुंबाने नकार दिला आणि क्षणात सगळं कोसळलं. एका अटीमुळे फुलायच्या आधीच नातं तुटलं, या प्रकरणी मुलासह चार जणांवर हुंडाबळी कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तक्रारीनुसार, फिर्यादी ही 28 वर्षांची असून ती मारेगाव तालुक्यातील रहिवासी आहे. ती स्पर्धा परीक्षेची तयारी करत आहे. तिचे लग्न यवतमाळ येथील मयुर सुरेश गिरी (वय 33) याच्याशी 1 फेब्रुवारी 2026 रोजी ठरले होते. त्यानंतर 1 मार्च 2026 रोजी वणीतील एका मंदिरात साक्षगंध पार पडला. त्या वेळी मुलाकडून कोणतीही मागणी करण्यात आली नव्हती.
4 मार्च 2026 रोजी रात्री सुमारे 10:30 वाजता मयुर गिरी याने मुलीला फोन करून “लग्न यवतमाळ येथे AC हॉलमध्ये थाटामाटात करावे” अशी मागणी केली. ही बाब मुलीने आपल्या वडिलांना सांगितल्यानंतर त्यांनी मध्यस्थी नातेवाईकाशी संपर्क साधला. यावेळी मुलाकडल्या मध्यस्थी नातेवाईकाने लग्न मोडले आहे. आपण इथेच थांबू असा निरोप दिला. या प्रकाराने मुलगी व तिच्या कुटुंबीयांना मोठा धक्का बसला. मुलीकडच्या नातेवाईकांनी मुलाच्या नातेवाईकांना निरोप पाठवत यवतमाळ येथे घरी भेटून तोडगा काढू अशी विनवणी केली.
मात्र तुम्ही आमच्या घरी येऊ नका, असे उत्तर देत मुलाकडील लोकांनी लग्नास नकार दिला. यानंतर मुलीने मारेगाव पोलीस स्टेशन गाठत याबाबत तक्रार दिली. पोलिसांनी मुलगा मयुर सुरेश गिरी, त्याचे वडील सुरेश गिरी (वय 55), मोठे वडील नामदेव भाऊराव गिरी (वय 67) तसेच मामा सतीश दिवाकर गिरी (वय 45, रा. चांदूर रेल्वे, अमरावती) यांच्याविरोधात हुंडाबंदी अधिनियम कलम 4 तसेच भारतीय न्याय संहिता कलम 3(5) अंतर्गत गुन्हा नोंदवला असून पुढील तपास सुरू आहे.



Comments are closed.