मेंढोली–पिंपरी रस्ता: मनोज काळे यांच्या उपोषणाचा दुसरा दिवस
7 वर्षांपासून अपूर्ण काम; मान्यवरांचा उपोषणाला पाठिंबा
बहुगुणी डेस्क, वणी: मेंढोली ते पिंपरी रस्त्याचे काम प्रशासनाच्या दिरंगाईमुळे रखडल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. या प्रश्नावर मनोज काळे यांनी सुरू केलेल्या आमरण उपोषणाचा आज, 04 एप्रिल रोजी दुसरा दिवस असून विविध क्षेत्रातील मान्यवरांनी उपोषणस्थळी भेट देत आंदोलनाला पाठिंबा दर्शवला.
वणी तालुक्यातील मेंढोली ते पिंपरी या सुमारे 4 किलोमीटर रस्त्याला 2018-19 मध्ये शासनाची मंजुरी मिळाली होती. खनिज विकास निधीतून निधी उपलब्ध झाल्यानंतर कामालाही सुरुवात झाली. मात्र, वनविभागाच्या हद्दीत येणाऱ्या ‘जंगल क’ वर्ग गट क्रमांक 34 मधील 600 मीटर भागासाठी परवानगी न मिळाल्याने रस्त्याचे काम अर्धवट अवस्थेत थांबले आहे.
या संदर्भात ग्रामपंचायत मेंढोली व सार्वजनिक बांधकाम उपविभाग, वणी यांनी प्रस्ताव सादर केला होता. वनविभागाने 2 जून 2018 रोजी त्रुटी दाखवून दिल्या होत्या. मात्र, त्या त्रुटींची पूर्तता करण्यात प्रशासनाकडून हलगर्जीपणा झाल्याने मंजूर निधी परत गेला आणि काम पूर्णपणे ठप्प झाले.
दरम्यान, रस्ता पूर्ण करण्यासाठी मनोज काळे यांनी 12 फेब्रुवारी रोजी सार्वजनिक बांधकाम विभागाला निवेदन दिले होते. तरीही दीड महिन्याहून अधिक काळ लोटून कोणतीही ठोस कार्यवाही न झाल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. यामुळे संतप्त होत 3 एप्रिलपासून वनविभागाच्या हद्दीजवळ आमरण उपोषण सुरू करण्यात आले. आज दुसऱ्या दिवशी विविध क्षेत्रातील गणमान्य व्यक्तींनी उपोषण मंडपाला भेट देत आंदोलनाला पाठिंबा दिला. दरम्यान, प्रशासनाने तात्काळ दखल न घेतल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.



Comments are closed.