शिंदोला – वणी तालुक्यातील शिंदोला येथे असोसिएशन सिमेंट कंपनीची स्थापना चार दशकांपूर्वी करण्यात आली. सिमेंटसाठी लागणाऱ्या कच्च्या मालाचे उत्खनन करण्यासाठी गोवारी (पार्डी) येथील शेतकऱ्यांना खोटे आश्वासन दाखवून शेतजमिनी खरेदी केल्या. मात्र ग्रामस्थांच्या मूलभूत समस्या सोडविण्याकडे कायमस्वरूपी दुर्लक्ष केले. म्हणून ग्रामस्थांनी खासदार हंसराज अहीर यांना निवेदनाद्वारे न्याय मिळवून देण्याची मागणी केली आहे.
शिंदोला परिसरातून सिमेंटसाठी लागणारा कच्चा माल उत्खनन केला जातो. दगडाची चुरी बनवुन कन्व्हेअर बेल्टद्वारे चंद्रपूर जिल्ह्यातील नकोडा येथे वहन करून सिमेंट तयार होते. मात्र एका नावारूपाला आलेल्या कंपनी कडून प्रकल्पबाधीतांच्या समस्या सोडविण्याकडे दुर्लक्ष होत आहे. सध्या तर कंपनीचा अतिरेक वाढला आहे. विशेष म्हणजे कंपनीने गोवारी ते शिंदोला हा पिढ्यानपिढ्या असलेला एकमेव वहिवाटीचा रस्ता तोडला. ग्रामस्थांना शिंदोला येथे ये-जा करण्यासाठी पर्यायी रस्ता उपलब्ध नसताना कंपनीने हे संतापजनक कृत्य केले. त्यामुळे ग्रामस्थ चीड व्यक्त करीत आहे.
कंपनीने खाणीचे नियमबाह्य खोलीकरण केले. त्यामुळे गावातील भूजल पातळी खालावली. परिणामी गावात उन्हाळ्यात तीव्र पाणी टंचाई निर्माण होते. ब्लास्टिंगमुळे घरांना तडे गेले. काही घरांची पडझड झाली. परंतु नुकसानग्रस्त मदतीपासून वंचित आहेत. कच्च्या मालाची वाहतूकीमुळे परिसरात धूळ पसरते. त्यामुळे शेतमालाचे नुकसान होत आहे. मात्र कंपनी कडून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना नुकसान भरपाई दिली जात नाही.
प्रकल्पासाठी शेतजमिनी घेतल्या त्यामुळे शेतकरी, शेतमजूराच्या हाताला काम राहिले नाही. मात्र कंपनीने बेरोजगारांची कायम थट्टा केली. ग्रामस्थांचे उपजीविकेचे साधन हिरावल्यामुळे बेरोजगाराना कामासाठी भटकंती करावी लागते. सदर गाव कंपनीचे दत्तक गाव असूनही पाणी,वीज,आरोग्य आदी समस्यांकडे सोईस्करपणे दुर्लक्ष केले जाते. म्हणून त्रस्त ग्रामस्थांनी खासदार अहीर यांना समस्या बाबत अवगत करण्यासाठी निवेदन दिले. निवेदनावर बापूजी बोर्डे, किशोर पारखी, इक्बाल पठाण,विठ्ठल पारखी, शंकर पाचभाई, सुनील बोर्डे, मारोती वैध यांच्या स्वाक्षरी आहेत.