जितेंद्र कोठारी, वणी: नवीन वर्षाच्या स्वागताची पार्टी करून गावी परतणा-या दुचाकीचा गंभीर अपघात झाला. या अपघातात चालक जागीच ठार झाला तर मागे बसलेला त्याचा मित्र जखमी झाला आहे. वणी जवळील ब्राह्मणी फाट्याजवळ मध्यरात्री 1 वाजताच्या सुमारास ही दुर्दैवी घटना घडली. निखिल गजानन बोढे (20) रा. मंदर असे मृतकाचे नाव असून प्रफुल्ल महादेव बोढे (25) रा. मंदर या तरुण जखमी झाला आहे.
मृतक निखिल व प्रफुल्ल हे दोघे तालुक्यातील मंदर येथील रहिवाशी आहे. हे दोघेही चुलत भाऊ आहे. शुक्रवारी वणी येथे नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी मंदरहून आले होते. रात्री पार्टी करून 1 वाजताच्या सुमारास ते वणीहून ब्राह्मणी मार्गे पल्सर या दुचाकीने (MH34 BQ 5340) मंदरला परत जात होते. दरम्यान ब्राह्मणी फाट्याजवळ हायवेच्या आधी असलेल्या स्पीड ब्रेकरवर त्यांची गाडी उसळली. त्यामुळे चालकाचे गाडीवरचे नियंत्रण सुटले व गाडी हायवे वरील दुभाजकावर आदळली.
या अपघातात निखिलच्या डोक्याला जबर मार लागला. अती रक्तस्राव झाल्याने निखिल जागीच ठार झाला तर प्रफुल्ल हा जखमी झाला. सध्या प्रफुल्लवर उपचार सुरू आहे. ऐन नववर्षांच्या सुरुवातीलाच निखिलचा अपघाती दुर्दैवी मृत्यू झाल्याने मंदर गावात शोककळा पसरली आहे. वणी पोलीस ठाण्यात निखिलच्या मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. प्रकऱणाचा वणी पोलीस तपास करीत आहे.
दुचाकीस्वारांनी हेलमेट वापरण्याचे आवाहन
काम, नोकरी, बाजार इत्यादी कारणांसाठी मोठ्या प्रमाणात लोक तालुक्याच्या ठिकाणी दुचाकीने येतात. तसेच अनेक लोक नोकरी व इतर कामांसाठी दुचाकीने परगावी जातात. अवजड वाहनांची रहदारी, खराब रस्ते किंवा वन्य प्राणी आडवे आल्याने अपघाताच्या घटना नित्याच्याच आहे. तालुक्यात एका महिन्यात अनेकांना अपघातामुळे जीव गमवावा लागतो. या अपघातात सर्वाधिक मृत्यू हे डोक्याला गंभीर ईजा झाल्याने होतात. अनेक तरुण तसेच घरातील कर्त्याधर्त्या व्यक्तींना डोक्यावर केवळ हेलमेट नसल्याने जीव गमवावा लागला आहे. तर दुसरीकडे फक्त डोक्यावर हेलमेट असल्याने अनेकांचा जीव वाचला आहे. त्यामुळे दुचाकी चालकांनी हेलमेटचा वापर करावा असे आवाहन ‘वणी बहुगुणी’तर्फे करण्यात येत आहे.
हे देखील वाचा:
Comments are closed.