लालपुलिया परिसरात भरधाव बोलेरोची धडक, एक जागीच ठार

रात्रीची घटना, धाब्याकडे जाण्यासाठी रस्ता ओलांडताना अपघात

बहुगुणी डेस्क, वणी: वणी शहरातील लालपुलिया परिसरात निष्काळजी व भरधाव वाहनचालकामुळे पादचाऱ्याचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. सोमवारी रात्री ही घटना घडली. मारेगाव–यवतमाळकडून वणीकडे जाणाऱ्या बोलेरो पिकअप वाहनाने रस्ता ओलांडत असलेल्या एकाला जोरदार धडक दिली. या अपघातात त्यांचा मृत्यू झाला. चेंडकु रामभाऊ आत्राम (52) असे मृतकाचे नाव आहे. वाहन चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तक्रारीनुसार मृतक चेंडकु रामभाऊ आत्राम (52) हे पळसोनी ता. वणी येथील रहिवासी होते. आत्राम हे त्यांचे दुचाकी घेऊन लालपुलिया परिसरातील अमित नामक धाब्यावर जेवण करण्यासाठी गेले होते. केरला टायर्सजवळ दुचाकी लावून ते जेवणासाठी रस्ता ओलांडून अमित ढाब्याकडे पायदळ जात होते.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

यावेळी मारेगाव–यवतमाळकडून वणीकडे येणाऱ्या बोलेरो पिकअपसारख्या वाहनाने भरधाव व निष्काळजीपणे वाहन चालवत त्यांना जोरदार धडक दिली. अपघातानंतर संबंधित वाहनचालक घटनास्थळावरून फरार झाला. अपघाताची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी जखमी अवस्थेतील चेंडकु आत्राम यांना तातडीने शासकीय रुग्णालयात दाखल केले. मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीअंती त्यांना मृत घोषित केले.

या घटनेप्रकरणी मृतकाचा मुलगा वैभव चेंडकु आत्राम यांनी वणी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. तक्रारी वरून पिकअप वाहनाच्या चालकाविरुद्ध भा.न्या.सं. कलम 281 व 106(1) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर गुन्ह्याचा तपास वणी पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार अविनाश करीत असून फरार वाहनचालकाचा शोध सुरू आहे.

Comments are closed.