नवा अध्याय सुरू; विद्या आत्राम यांनी स्वीकारला नगराध्यक्षपदाचा पदभार
उपाध्यक्षपदी राकेश बुग्गेवार, हे आहेत 3 स्वीकृत नगरसेवक... उपाध्यक्ष पदासाठी अडीच वर्षांचा फॉर्म्युला
निकेश जिलठे, वणी: नवनिर्वाचित नगराध्यक्ष विद्या खेमराज आत्राम यांनी आज सोमवारी दुपारी नगराध्यक्ष पदाचा पदभार अधिकृतरीत्या स्वीकारला. यासह आज नगरपालिकेची विशेष सभा झाली. यात राकेश बुग्गेवार यांची उपाध्यक्ष पदी निवड करण्यात आली. तर स्वीकृत नगरसेवक पदी भाजपतर्फे रवि बेलूरकर, किशन खुंगर व महाविकास आघाडी तर्फे शिवसेना उबाठाचे शत्रुघ्न मालेकर यांची निवड करण्यात आली. पदभार स्वीकारल्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत नवनिर्वाचित नगराध्यक्ष विद्या आत्राम यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या 100 दिवसांच्या कृती आराखड्यानुसार कार्य करणार असून पाणी, स्वच्छता व शिक्षण हे मुद्दे अग्रक्रमावर राहणार असल्याचे स्पष्ट केले.
दुपारी 11.30 वाजता नगर पालिकेत भाजपतर्फे पदभार सोहळा आयोजित करण्यात आला. या सोहळ्याला आदिवासी विकास मंत्री अशोक उईके, भाजप जिल्हाध्यक्ष प्रफुल्ल चव्हाण, माजी आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार, भाजपचे जिल्हा समन्वयक नितीन भुतडा, माजी नगराध्यक्ष तारेंद्र बोर्डे, शहर अध्यक्ष अॅड नीलेश चौधरी यांची प्रमुख उपस्थिती होती. मा. जिजाऊंना व स्वामी विवेकानंद यांना अभिवादन करून सोहळ्याला सुरूवात झाली. सर्वप्रथम विद्या आत्राम यांनी मनोगत व्यक्त केले.
राजकारण नाही तर लोककारण करणार !
वणीकर जनतेने आमच्यावर टाकलेला विश्वास हीच आमची सर्वात मोठी ताकद असून त्यातूनच आमची जबाबदारी अधिक वाढली आहे. आम्ही राजकारण नाही, तर लोककारण करणार आहोत. वणीकरांच्या मुलभूत प्रश्नांना प्राधान्य देत सर्वसामान्यांच्या अपेक्षांवर खरे उतरण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला जाईल. वणीच्या सर्वांगीण विकासासाठी सर्व घटकांनी एकत्र येणे गरजेचे आहे. स्वच्छ, सुंदर, सुरक्षित व विकसीत वणी घडवण्यासाठी आम्ही कटिबद्ध असून राज्यात एक आदर्श नगरपालिका म्हणून वणीचे नाव उंचावण्याचा संकल्प राहिल.— विद्या आत्राम नवनिर्वाचित नगराध्यक्ष, वणी नगरपालिका
सोहळ्यात मनोगत व्यक्त करताना माजी नगराध्यक्ष तारेंद्र बोर्डे यांनी त्यांच्या पाच वर्षांच्या कार्यकाळात आलेल्या विविध अडचणी, तसेच त्या काळात राबविण्यात आलेल्या विकासात्मक उपक्रमांचा सविस्तर आढावा घेतला. शहराच्या विकासासाठी सर्वांनी पक्षविरहित दृष्टिकोन ठेवून काम करावे, तसेच सर्व घटकांना विश्वासात घेऊन एकत्रितपणे पुढे जावे, असे मार्गदर्शन प्रफुल्ल चव्हाण यांनी केले. निवडणुकीपूर्वी वणीकर जनतेला दिलेली सर्व आश्वासने पूर्ण करण्यावर भर राहणार असल्याचे संजीवरेड्डी बोदकुरवार यांनी स्पष्ट केले. यावेळी त्यांनी माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या कवितेतील ओळी सादर करत उपस्थितांना भावनिक केले, ज्याला उपस्थितांकडून उत्स्फूर्त दाद मिळाली.

याप्रसंगी मंत्री अशोक उईके यांनी वणी शहराच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक ती सर्वतोपरी मदत शासनाच्या माध्यमातून दिली जाईल, असे ठाम आश्वासन दिले. नगरपालिकेच्या पायाभूत सुविधा, रस्ते, पाणीपुरवठा, स्वच्छता, आरोग्य व नागरी सोयीसुविधा अधिक सक्षम करण्यासाठी निधी उपलब्ध करून देण्यात येईल, तसेच वणीच्या विकासात कोणतीही अडचण येऊ दिली जाणार नाही, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. कार्यक्रमात नगरपालिकेच्या महिला स्वच्छता कर्मचारी, पालिकेच्या महिला कर्मचारी व पालिकेच्या शाळेतील शिक्षिकांचा सन्मान करण्यात आला.
सोहळ्यानंतर विद्या आत्राम यांनी अधिकृतरीत्या नगराध्यक्ष पदाचा पदभार स्वीकारला. त्यानंतर पालिकेची पहिली विशेष झाली. यात उपाध्यक्ष व स्वीकृत नगरसेवकांची निवड करण्यात आली. त्यानंतर नगराध्यक्ष यांच्या दालनात पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले. माजी आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांनी पालिका कामकाजात कोणाचाही कुठलाही हस्तक्षेप राहणार नसून शहराच्या सर्वांगीण विकासावर भर राहणार असल्याचे सांगितले. तर विद्या आत्राम यांनी विकासाचे व्हिजन मांडले.
…आणि लक्ष्मण उरकुडे यांनी करून दिली आठवण !
पत्रकार परिषदेत उपाध्यक्ष पदाचा कार्यकाळ कसा असणार यावर माजी आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार हे पत्रकारांना माहिती देत होते. अधिकाधिक नगरसेवकांना संधी मिळावी यासाठी आम्ही अडीच वर्षाचा कार्यकाळ हा पॅटर्न राबवणार असे सांगत असताना लक्ष्मण उरकुडे यांनी बोदकुरवार यांना मध्येच टोकत जिल्हाध्यक्ष यांनी जे ठरवले याबाबत माहिती देण्याची आठवण करून दिली. त्यानंतर बोदकुरवार यांनी लक्ष्मण उरकुडे यांना पालिकेचा अनुभन नसल्याने पहिले अडीच वर्ष राकेश बुग्गेवार यांना संधी दिली असून त्यानंतरचे अडीच वर्ष लक्ष्मण उरकुडे उपाध्यक्ष राहणार असल्याचे सांगितले. भर पत्रकार परिषदेत मध्येच थांबवत आठवण करून देण्याच्या प्रकारामुळे उपाध्यक्ष पदासाठी पक्षांतर्गत चांगलीच खडाजंगी झाल्याचे बाहेर आले.
पालिकेची पहिलीच सभा असल्याने सर्व नवनिर्वाचित नगरसेवकांची उपस्थिती होती. पदग्रहण सोहळा भाजपने आयोजित केला असल्याने कामकाजाच्या पहिल्या दिवशी सत्ताधारी भाजपची छाप दिसून आली. दरम्यान शत्रुघ्न मालेकर यांची स्वीकृत नगरसेवकपदी निवड झाल्यानंतर शिवसैनिकांनी जल्लोष व्यक्त करत विरोध पक्ष म्हणून त्यांच्या देखील अस्तित्वाची जाणीव सत्ताधा-यांना करून देण्याचा प्रयत्न केला.
पदभार स्वीकार सोहळ्यानिमित्त नवनिर्वाचित नगराध्यक्ष तसेच नगरसेवकांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यासाठी शहरातील विविध क्षेत्रांतील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.




Comments are closed.