उभ्या ट्रकवर आदळली दुचाकी, युवक गंभीर जखमी

यवतमाळ रोडवर अपघाताची श्रृंखला, पोलीस विभाग निद्रावस्थेत

जितेंद्र कोठारी, वणी: भरधाव दुचाकी उभ्या ट्रकवर आदळून दुचाकीस्वार युवक गंभीर जखमी झाला. वणी यवतमाळ मार्गावर गौराळा फाट्याजवळ गुरुवारी रात्री 6.30 वाजता दरम्यान ही घटना घडली. अपघातात गंभीर जखमी गणेश बापूराव गुंजेकर (35) रा. बुरांडा याला उपचारार्थ चंद्रपूर येथे पाठविण्यात आल्याची माहिती आहे.

प्राप्त माहितीनुसार मारेगाव तालुक्यातील बुरांडा येथील गणेश गुंजेकार काही कामानिमित्त वणी येथे आला होता. काम आटोपून सायंकाळी परत गावाकडे जाताना गौराळा गावाजवळ रस्त्याच्या बाजूने उभा असलेला ट्रक अंधारात दिसून आला नाही. त्यामुळे गणेशची दुचाकी ट्रकवर मागून आदळली. या दुर्घटनेत दुचाकीस्वार गणेशच्या डोक्याला मार लागून रक्तस्त्राव झाला.

अपघाताची माहिती मिळताच जनहित कल्याणकारी संघटनेच्या रुग्णवाहिकेतून जखमीला वणी येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र प्रकृती अत्यंत चिंताजनक असल्याने त्याला पुढील उपचारार्थ चंद्रपूर येथे पाठविण्यात आले.

वणी यवतमाळ मार्गावर मागील काही दिवसांपासून अपघाताची श्रृंखला सुरु आहे. एक दिवसापूर्वीच उभ्या ट्रकवर दुचाकी आदळून दुचाकीस्वार ठार झाल्याची घटना घडली होती. सतत अपघात घडत असताना वाहतूक पोलीस निद्रावस्थेत असल्याचे पहावयास मिळत आहे.

Comments are closed.