वणीला येत असताना तरुणाचा भीषण अपघात

डोक्याला गंभीर मार लागल्याने प्रकृती गंभीर

भास्कर राऊत, मारेगाव: दुचाकीने यवतमाळहून वणीला जात असणा-या एका तरुणाचा मांगरुळजवळ अपघात झाला. दिशादर्शक फलकाला गाडीची धडक बसल्याने तरुण गंभीर जखमी झाला. आज सकाळी 10.30 वाजताच्या सुमारास ही घटना घडली. सय्यद इफ्तेखार सय्यद अकील (वय 27 रा. इस्लामपूर, यवतमाळ) असे जखमी तरुणाचे नाव आहे.

सय्यद हा त्याची होन्डा शाईन या गाडीने यवतमाळहून वणीला जात होता. मारेगावच्या पुढे मांगरुळजवळील वेगाव फाट्याजवळ सय्यदच्या दुचाकीची दिशादर्शक फलकास जोरदार धडक बसली. ही धडक इतकी जबर होती की यात दिशादर्शक फलक कोसळून पडला. या अपघातात सय्यदच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे. अतिरिक्त रक्तस्राव झाल्याने सय्यद बेशुद्ध झाला होता.

अपघाताची माहिती मिळताच घटनास्थळावरील दोन अज्ञात तरुणांनी जखमीला मारेगाव येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. जखमीची बॅग तपासली असता त्यात ओळखपत्र आढळून आले. या ओळखपत्राच्या आधारे जखमीची ओळख पटली.

उपस्थित नागरिकांनी जखमीच्या भावाला यवतमाळ येथे कॉल करून अपघाताची माहिती दिली. मारेगाव येथील डॉक्टरांनी जखमीवर प्रथमोपचार केले. मात्र डोक्याला गंभीर मार असल्याने त्याला पुढील उपचारासाठी हलवण्याचा सल्ला दिला. त्यानुसार जखमीला सेवाग्राम/सावंगी येथे हलवण्यात आल्याची माहिती आहे. जखमी वणीसाठी कोणत्या कामासाठी येत होता हे अद्याप कळू शकले नाही. घटनेचा तपास मारेगाव पोलीस करीत आहे.

अपघातग्रस्त गाडी

दुचाकीस्वारांनी हेलमेट वापरण्याचे आवाहन
काम, नोकरी, बाजार इत्यादी कारणांसाठी मोठ्या प्रमाणात लोक तालुक्याच्या ठिकाणी दुचाकीने येतात. तसेच अनेक लोक नोकरी व इतर कामांसाठी दुचाकीने परगावी जातात. अवजड वाहनांची रहदारी, खराब रस्ते किंवा वन्य प्राणी आडवे आल्याने अपघाताच्या घटना नित्याच्याच आहे. तालुक्यात एका महिन्यात अनेकांना अपघातामुळे जीव गमवावा लागतो. या अपघातात सर्वाधिक मृत्यू हे डोक्याला गंभीर ईजा झाल्याने होतात. अनेक तरुण तसेच घरातील कर्त्याधर्त्या व्यक्तींना डोक्यावर केवळ हेलमेट नसल्याने जीव गमवावा लागला आहे. तर दुसरीकडे फक्त डोक्यावर हेलमेट असल्याने अनेकांचा जीव वाचला आहे. त्यामुळे दुचाकी चालकांनी हेलमेटचा वापर करावा असे आवाहन ‘वणी बहुगुणी’तर्फे करण्यात येत आहे. 

हे देखील वाचा:

धक्कादायक: आईवडील शेतात जाताच अल्पवयीन मुलगी घरुन बेपत्ता

आझाद इलेक्ट्रॉनिक्समध्ये गुडीपाडवा स्पेशल ‘ठंडा ठंडा कुल कुल’ ऑफर

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Comments are closed.