बहुगुणी डेस्क, वणी: मंदिरात स्वयंपाकासाठी महिलांना घेऊन जाणारा एक ऑटो पलटी झाला. या अपघातात वनोजा येथील 1 महिला ठार झाली तर दोन महिला गंभीर जखमी झाल्यात. नांदेपेरा-खैरे रोडवरील मार्डीजवळ आज सकाळी 11 वाजताच्या सुमारास हा अपघात झाला. शोभा पत्रू दारुणकर (65) असे मृत महिलेचे नाव आहे. दोन गंभीर महिलेपैकी एका महिलेच्या पायाला गंभीर इजा झाली असून तिला चंद्रपूर येथे रेफर करण्यात आल्याची माहिती आहे.
प्राप्त माहितीनुसार, शनिवारी दिनांक 15 मार्च रोजी येसेकर नामक एका व्यक्तीचा खैरे जवळील शनी मंदिराजवळ स्वयंपाक होता. यासाठी येसेकर यांनी गावातील एक ऑटो भाड्याने केला. सकाळी 11 वाजताच्या सुमारास गावातील स्वयंपाकी व इतर मदतनीस अशा गावातीलच 6 ते 7 महिला घेऊन हा ऑटो मार्डी मार्गे खैरीच्या दिशेने निघाला.
दरम्यान मार्डी जवळ बामर्डा फाट्याजवळ हा ऑटो पलटी झाला. या अपघातात शोभा या ऑटोखाली दबल्या गेल्या. त्यांच्या डोक्याला जबर मार लागला. तर दोन महिला गंभीर जखमी झाल्यात. गंभीर शोभाला वणीतील ग्रामीण रुग्णालय येथे आणण्यात आले मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषीत केले. या अपघातात माया तुकाराम कडूकर (55) व जिजा रमेश येसेकर (40) या गंभीर जखमी झाल्यात. यातील एका महिलेला चंद्रपूर येथे रेफर करण्यात आल्याची माहिती आहे.
घटनेची माहिती मिळताच मारेगाव पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते. त्यांनी घटनेचा पंचनामा केला. शोभा यांचा मृतदेह उत्तरिय तपासणीसाठी पाठवण्यात आला आहे. गेल्या 1 महिन्यापासून अपघातग्रस्त ऑटो घरीच लावलेला होता. आज स्वयंपाकाच्या निमित्ताने हा ऑटो भाड्याने देण्यात आला. गावातीलच एक चालक हा ऑटो चालवत होता. आजच ऑटो रस्त्यावर आला आणि ऑटोचा अपघात झाला. अपघातानंतर ऑटोचालक फरार झाल्याची माहिती आहे. खड्डा चुकवण्याच्या नादात हा अपघात झाल्याचे बोलले जात आहे. अपघात होताच घटनास्थळावर बघ्यांची एकच गर्दी झाली होती. वृत्त लिहेपर्यंत तक्रार दाखल करण्याची प्रक्रिया सुरु होती. (सदर बातमी प्राथमिक माहितीवर असून अधिक माहिती येताच बातमी अपडेट केली जाईल.)
Comments are closed.