बस पकडण्याच्या नादात वृद्ध लटकला चक्क धावत्या बसच्या खिडकीला

अपघातात 79 वर्षीय वृद्ध जखमी..

जितेंद्र कोठारी, वणी: सुटलेली बस बस पकडण्याच्या नादात एक वृद्ध चक्क चालत्या बसच्या खिडकीला लटकला. त्याच अवस्थेत या वृद्धाने काही अंतरही कापले. मात्र बस थांबताच ते खाली पडले. या अपघातात ते गंभीर जखमी झाले आहे. त्यांच्यावर मारेगाव येथे उपचार सुरू आहे. आज बुधवारी दिनांक 11 जानेवारी रोजी दुपारच्या सुमारास ही घटना घडली.

प्राप्त माहितीनुसार, यवतमाळ-गडचिरोली (MH40 Y5831) ही बस दुपारी सव्वा बारा वाजताच्या सुमारास यवतमाळहून निघाली. 2.30 वाजताच्या सुमारास ही बस मारेगाव येथे थांबली. निळकंठ पैकाजी बद्दलवार (79) रा. हिवरा मजरा ता. मारेगाव यांना वणीला जायचे होते. ते बस पकडण्यासाठी येत होते. मात्र त्या कालावधीत बस सुटली. त्यामुळे त्यांनी पळत धावत्या बसच्या खिडकीच्या गजाला पकडले व ते लटकून जाऊ लागले.

हा थरारक प्रसंग बघून बसमधल्या व बाहेरील लोकांनी आरडा ओरड सुरू केला. ही बाब लक्षात येताच कंडक्टरने बेल वाजवून बस थांबवली. अचानक ब्रेक लागताच निळकंठ यांची खिडकीची पकड सैल झाली व ते बसच्या खाली पडले. पोलीस स्टेशन समोर ही बस थांबली. या अपघातात वृद्ध जखमी झाला आहे. जखमीला तातडीने मारेगाव येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. अपघातात निळकंठ यांचा हात व पाय फ्रॅक्चर असल्याची माहिती मिळत आहे. पुढील तपास मारेगाव पोलीस करीत आहे.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Comments are closed.