वणी-मुकुटबन रोडवर भीषण अपघात, 1 जागीच ठार दुसरा गंभीर

दुपारी भरधाव ट्रक व दुचाकीची समोरासमोर धडक

विवेक तोटेवार, वणी: वणी-मुकुटबन मार्गावर उमरी गावाजवळ भरधाव ट्रक व दुचाकीची समोरासमोर जोरदार धडक झाली. यात दुचाकी चालक तरुणाचा जागीच मृत्यू झाला तर मागे बसलेला सहकारी गंभीर जखमी झाला. गुरुवारी 15 ऑगस्ट रोजी दुपारी 3 वाजताच्या सुमारास हा अपघात झाला. सुफियान शेख युनूस कुरेशी (22) रा. बेला असे मृत तरुणाचे नाव आहे. तर जखमी सय्यद इमरान सय्यद जाफर (32) याला पुढील उपचारासाठी यवतमाळ येथे रेफर केल्याची माहिती आहे.

सुफियान शेख युनूस कुरेशी (22) व सय्यद इमरान सय्यद जाफर (32) हे पाटण (झरी) जवळील बेला येथील रहिवासी होते. ते मजुरी करायचे. गुरुवारी ते त्यांची दुचाकी (TS01 EM7749) याने वणी येथे आले होते. वणीहून काम संपल्यानंतर दुपारच्या सुमारास ते दोघेही गावी परतत होते.

दुपारी 3 वाजताच्या सुमारास ट्रक (MH29 BE5634) व दुचाकीची समोरासमोर धडक झाली. हा अपघात इतका भीषण होता की यात दुचाकी चालक सुफियान याचा जागीच मृत्यू झाला, तर सैय्यद इमरान हा गंभीर जखमी झाला. त्याला सुरवातीला वणीच्या रुग्णालयात दाखल केले. परंतु प्रकृती गंभीर असल्याने त्याला यवतमाळ येथे रेफर करण्यात आले.

तक्रारीवरून वणी पोलीस ठाण्यात ट्रक चालक हिरालाल कबीर झाडे (24) रा. गणेशपूर याच्यावर बीएनएसच्या कलम 281, 325 (ब), 106 (1) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेचा तपास संतोष आढाव करीत आहे.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Comments are closed.