बहुगुणी डेस्क, वणी: वणी-मारेगाव मार्गावरील निंबाळा रोडवर दोन चारचाकी वाहनांमध्ये समोरासमोर भीषण धडक होऊन झालेल्या अपघातात मारेगाव येथील सचिन जगन देवाळकर (वय 37) यांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला. मंगळवारी रात्री सुमारे 9.30 वाजताच्या सुमारास निंबाळा-सोमनाळा जवळ ही घटना घडली. एका होतकरू तरुणाच्या अकाली निधनाने मारेगाव परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
प्राप्त माहितीनुसार, सचिन देवाळकर हे मूळचे मारेगाव येथील रहिवासी असून ते सध्या चंद्रपूर येथे खासगी नोकरी करत होते. मंगळवारी, 19 मे रोजी ते त्यांच्या मारोती अल्टो कारने चंद्रपूरहून मारेगावला आले होते. आईची भेट घेऊन रात्री ते रात्री सव्वा 9 वाजताच्या सुमारास मारेगावहून चंद्रपूर परत जात होते. दरम्यान निंबाळा-सोमनाळा परिसरात त्यांच्या कारची समोरून येणाऱ्या पिकअप वाहनाशी जोरदार धडक झाली.
अपघात इतका भीषण होता की कारच्या पुढील भागाचा अक्षरशः चक्काचूर झाला आणि गंभीर दुखापत झाल्याने सचिन देवाळकर यांचा जागीच मृत्यू झाला. प्राथमिक माहितीनुसार, ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात हा अपघात घडल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
अपघातानंतर घटनास्थळी उपस्थित नागरिकांनी तातडीने पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर सचिन देवाळकर यांना मारेगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी तपासणीनंतर त्यांना मृत घोषित केले. त्यांचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवण्यात आला आहे.
सचिन देवाळकर हे मनमिळावू स्वभावाचे असल्याने त्यांच्या निधनाची वार्ता समजताच मारेगाव परिसरात शोककळा पसरली. त्यांच्या पश्चात आई, पत्नी आणि दोन लहान मुले असा परिवार असून, कुटुंबातील कर्त्या व्यक्तीच्या निधनाने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. प्रकरणाचा पुढील तपास मारेगाव पोलीस करीत आहे.


Comments are closed.