बहुगुणी डेस्क, मारेगाव: विद्यार्थ्यांना शाळेत पोहोचवणा-या ऑटोला पिसगावजवळ भीषण अपघात झाला. आज सकाळी 6.30 वाजताच्या सुमारास हा अपघात झाला. या अपघातात एक विद्यार्थी जागीच ठार झाला. अनिकेत उर्फ निकेश श्रावण पिंपळशेंडे (16) असे मृत विद्यार्थ्याचे नाव असून तो केगाव (मार्डी) येथील रहिवासी होता. या अपघातात 3 विद्यार्थी जखमी झाले आहेत.
आज शुक्रवारी दिनांक 27 ऑक्टोबर रोजी सकाळी मार्डी येथून एक ऑटो 8-10 विद्यार्थ्यांना घेऊन मारेगाव येथे जात होता. अनिकेत हा राष्ट्रीय विद्यालय मारेगाव येथे 10 व्या वर्गात शिकत होता. तो सकाळी शाळेत जाण्यासाठी या ऑटोत बसला व तो मारेगाव कडे येत होता. दरम्यान पांढरकवडा (ल) येथून एक ऑटो पिसगावच्या दिशेने येत होता.
या दोन्ही ऑटोची धडक झाली. यामुळे मारेगावकडे जाणारा ऑटो पलटी झाला. अनिकेत हा ऑटोचालका शेजारी बसला होता. ऑटो पलटी झाल्याने तो ऑटोखाली दबला गेला. या अपघातात त्याच्या डोक्याला जबर मार लागला. हा अपघात इतका भीषण होता की पलटी झाल्यावर ऑटो काही अंतर घासत गेला. अपघाताची माहिती मिळताच गावातील लोकांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी अनिकेतला बाहेर काढले. अनिकेतसह जखमींना मारेगाव येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी याला मृत घोषीत केले.
अपघातात महेश्री संजय टोंगे (18) रा. किन्हाळा, पल्लवी विजय जुमडे (17) रा. मार्डी, दिपिका बालाजी चौघुले (18) रा. वडगाव हे तीन विद्यार्थी जखमी झालेत. अनिकेत याच्या मृत्यूमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. घटनेची माहिती मिळताच मारेगाव पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते. प्रकरणाचा तपास मारेगाव पोलीस करीत आहे.
ऑटो पलटीची या महिन्यातील 3 री घटना
गेल्या काही दिवसांपासून ऑटो पलटी होण्याच्या घटनेत वाढ होत आहे. या महिन्यात ऑटो पलटी झाल्याची ही तिसरी घटना आहे. 4 ऑक्टोबर रोजी रांगणा जवळ ऑटो पलटी झाल्याने एकाचा मृत्यू झाला होता. गेल्या आठवड्यातच 21 ऑक्टोबरला भाविकांना घेऊ जाणार ऑटो पलटी झाला होता. यात 7 भाविक जखमी झाले होते. विशेष म्हणजे हे सर्व अपघात भरधाव असताना अचानक ब्रेक दाबल्याने चालकाचे नियंत्रण सुटून झाले आहे. भरधाव व क्षमतेबाहेर प्रवासी घेऊन ऑटोने सर्वत्र वाहतूक होत आहे. मात्र वाहतूक विभागाचे याकडे दुर्लक्ष होत आहे.
Comments are closed.