विवेक तोटेवार, वणी: वणी वरून वरो-याच्या दिशेने जाणा-या एका दुचाकीला विरुद्ध दिशेने येणा-या भरधाव कारने धडक दिली. यात दोघे जण जागीच ठाऱ झाले तर एकाची प्रकृती गंभीर आहे. सावर्ला नजीक संध्याकाळी 6.15 वाजताच्या सुमारास हा अपघात झाला. हा अपघात इतका भीषण होता की यात दुचाकीचा चुराडा झाला. अतुल उर्फ आकाश शंकर गाउत्रे (27) रा. रंगारीपुरा वणी, अमोल मडावी (32) रा. जैताई मंदिर जवळ वणी असे मृतकाचे नाव असून रानु तुमसाम (28) रा. पोलीस लाईन भीमनगर हा गंभीर जखमी आहे. घटनेची माहिती मिळताच अपघात ग्रस्तांच्या परिचितांनी ग्रामीण रुग्णालयात गर्दी केली होती.
प्राप्त माहितीनुसार अतुल, अमोल व रानू हे तिघे संध्याकाळी 6 वाजताच्या सुमारास अतुलच्या पॅशन या दुचाकीने (MH29 BG5124) ट्रीपल सीट वरोरा येथे एका वर्षश्राद्धासाठी निघाले होते. सध्या वणी ते वरोरा या रस्त्याचे काम सुरू असल्याने अनेक ठिकाणी या मार्गावरून एक लेन बंद केलेली आहे. त्यामुळे एकाच लेनमधून दोन्ही दिशेला वाहतूक होते. दुचाकीस्वार हे त्यांच्या लेनमधून जात होते. त्यांच्या विरुद्ध दिशेने एक ट्रक देखील येत होता. या ट्रकला कारने (MP48 ZA2249) ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याचवेळी अचानक भरधाव कारसमोर दुचाकी आली व कारने दुचाकीला धडक दिली.
ही धडक इतकी जबर होती की दुचाकीचा चुराडा झाला. अपघातात अतुल गाउत्रे व अमोल मडावी यांच्या डोक्याला गंभीर इजा झाली. तर तिसरी व्यक्ती रानू रस्त्याच्या बाहेर फेकली गेली. अपघात होताच रस्त्याने जाणारे लोक थांबले. दोघांच्याही डोक्यातून प्रचंड रक्तस्राव झाला होता. तर रानू याच्या पायाला गंभीर दुखापत झाली होती. लोकांनी तिघांनाही वणीतील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी आणले. मात्र डॉक्टरांनी अतुल व अमोल यांना मृत घोषीत केले. तर रानू गंभीर जखमी असून त्याच्या पायाला गंभीर दुखापत झाल्याची माहिती आहे. घटनेची माहिती मिळताच मृतकांच्या परिचितांनी ग्रामीण रुग्णालयात एकच गर्दी केली होती.
वन वे वाहतुकीचे आणखी किती बळी?
सध्या वणी-वरोरा रोडचे काम सुरू असल्याने अनेक ठिकाणी या मार्गावरून एकाच लेनमधून दोन्ही दिशेची वाहतूक सुरू आहे. काही दिवसांआधी दोन ट्रकची समोरा समोर भीषण धडक झाली होती. यात ट्रकचालकाचा जागीच मृत्यू झाला होता. तर दुसरा चालक गंभीर जखमी झाला होता. याशिवाय या मार्गावर वन वे वाहतुकीमुळे अनेक छोटे मोठे अपघात झाले आहे. यावर वाहतूक विभागाने तातडीने पावले उचलणे गरजेचे झाले आहे.
हे देखील वाचा:
अती घाई संकटात नेई, दुचाकी उभ्या ट्रकला धडकल्याने तरुण जागीच ठार
Comments are closed.