दोन ट्रकची समोरासमोर धडक, एक ठार, एक गंभीर

खैरी-कोसारा रोडवरील घटना, दोन्ही कॅबिनचा चुराडा

भास्कर राऊत, मारेगाव: खैरी-कोसारा रोडवर दोन ट्रकची समोरासमोर धडक झाली. यात एक जण जागेवरच ठार झाला तर दुसरा गंभीर जखमी झाला आहे. सकाळी 9.30 ते 10 वाजताच्या सुमारास हा अपघात झाला. वृत्त लिहेपर्यंत मृतकाची व जखमीची ओळख पटलेली नाही.

सविस्तर वृत्त असे की, खैरी ते कोसारा व्हाया वरोरा या मार्गांवर मोठ्या प्रमाणात वाहतूक होत असते. यवतमाळ आणि चंद्रपूर जिल्ह्याला जोडणारा हा मार्ग असून या मार्गांवर रेती आणि कोळशाची मोठ्या प्रमाणावर वाहतूक होत असते. आज गुरुवारी दिनांक 26 मे रोजी सकाळच्या 9.30 ते 10 च्या सुमारास खैरीवरून (MH34 BG0799) हा कोळशाने भरलेला ट्रक वरोऱ्याकडे जात होता.

याच वेळी विरुद्ध दिशेने म्हणजेच वरोऱ्याकडून खैरीकडे जय माँ अंबे ट्रान्सपोर्टचा (MH 34 AB 9799) हा ट्रक चाललेला होता. खैरी ते कोसारा दरम्यान असलेल्या एका वळणावर दोन्ही ट्रक एकमेकांना भिडले. ही धडक एवढी जबरदस्त होती की दोन्ही ट्रकच्या कॅबिनचा जवळजवळ चुराडा झाला.

या अपघातात दोन्ही ट्रकमधील चालक कॅबिनमध्ये फसले होते. त्यापैकी एकाचा जागेवरच मृत्यू झाला. तर दुसरा गंभीर जखमी झाला. घटनेची माहिती मिळताच वडकी पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते. चालकांना काढण्याचा प्रयत्न सुरु होता.

वाहतूक विभागाने लक्ष देण्याची गरज
वरोरा आणि वणी तालुक्यामध्ये मोठया प्रमाणावर कोळशाच्या खदानी आहेत. या खदानीमधील कोळशाची ट्रकद्वारे वाहतूक होत असते. तसेच या दोन्ही तालुक्यामधून वर्धा नदी वाहते. आणि या वर्धा नदीच्या रेतीची वाहतूकसूद्धा या मार्गांवरून होत असते. या सर्व कारणांमुळे या मार्गांवर वाहनांचे आवागमन मोठया प्रमाणावर असते. मोठया प्रमाणावर असलेल्या या वाहणांच्या वेगाला मर्यादा सुद्धा नसते. त्यामुळे वणी खैरी तसेच खैरी माढेळी या मार्गांवर छोटेमोठे अपघात वारंवार होत असतात. यावर सुद्धा नियंत्रण असायला हवे असा सुरु नागरिकांमधून उमटत आहेत.

 

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Comments are closed.