मुकुटबन मार्गावर 3 वाहनाचा अपघात, पिकअप चालक गंभीर

डायमंड किड्स स्कूल समोरील घटना

जितेंद्र कोठारी, वणी : वणी मुकुटबन मार्गावर रविवार 24 एप्रिल रोजी 3 वाहनाचा अपघात झाला. छोरिया ले आउट परिसरातील डायमंड किड्स स्कूल समोर घडलेल्या या घटनेत मालवाहू पिकअप वाहन समोरून येणाऱ्या ट्रकला धडक देऊन पलटी झाला. या दुर्घटनेत पिकअप वाहन चालक गंभीररित्या जखमी झाला असून वणी ग्रामीण रुग्णालयात प्रथमोपचार केल्यानंतर चंद्रपूर येथे रेफर करण्यात आल्याची माहिती आहे.

प्राप्त माहितीनुसार रविवारी दुपारी 2 वाजता दरम्यान वणी मुकूटबन मार्गावर डायमंड किड्स स्कूलसमोर मुकूटबन कडून भरधाव येणारी मालवाहू पिकअप जीप क्र. (MH29BE2427)  एका कारला ओव्हरटेक करताना समोरुन येणाऱ्या ट्रक क्र.(MH34BG4510) वर जाऊन आदळली. ट्रकला धडक देऊन पिकअप वाहन पलटी झाले. अपघातात पिकअप वाहनाचा चालक सीट आणि स्टेयरिंगच्या मध्यात अडकून गंभीर जखमी झाला. या घटनेत वऱ्हाडी घेऊन जाणारी प्रवासी कारचाही नुकसान झाला. मात्र सुदैवाने जीवितहानी झाली नाही.

मुकुटबन मार्गावर 3 वाहनाचा अपघात झाल्याची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी पोहचले. मात्र त्यापूर्वी काही नागरीकांनी जखमी पिकअप चालकाला बाहेर काढून ग्रामीण रुग्णालयात पाठविले. पोलिसानी अपघातग्रस्त पिकअप जीपला टोचन करून पोलिस स्टेशन येथे आणले. तसेच ट्रकलाही ताब्यात घेण्यात आले. अपघाताबाबत अद्याप पोलिस स्टेशन येथे कोणीही तक्रार दाखल केली नाही. तसेच जखमी चालकाचे नावपत्तासुद्धा कळू शकले नाही. 

Comments
Loading...
error: कॉपी करू नका, बातमी आवडल्यास शेअर करा !!