वणीतील तरुणाचा मुंबई पुणे हायवेवर अपघात

जितेंद्र कोठारी, वणी: नोकरीनिमित्त पुणे येथे राहणा-या वणीतील एका तरुणाचा पुणे-मुंबई हायवेवर भीषण अपघात झाला. या अपघात त्याचे जागीच निधन झाले तर त्याचा सहकारी गंभीर जखमी आहे. शुभम विनोद आसुटकर (26) रा. नांदेपेरा रोड वणी असे मृत तरुणाचे नाव असून सोमवारी मध्यरात्री 2 वाजताच्या (28 फेब्रुवारी) सुमारास पुणे-मुंबई हायवेवरील कसारा घाटात हा अपघात झाला. त्याचे पार्थिव आज सकाळी 11 वाजता वणी येथे आणण्यात आले. त्यानंतर लगेच त्याच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

सविस्तर वृत्त असे की शुभम विनोद आसुटकर हा वणीतील एयू बँकेत नोकरीवर होता. काही दिवसांआधी त्याला पुणे कार्यालयात बढती मिळाली. त्यामुळे तो पुणे येथे नोकरीनिमित्त स्थायिक झाला होता. सोमवारी दिनांक 27 फेब्रुवारी रोजी एका कामासाठी शुभम पुण्याहून दुचाकीने त्याच्या मित्रासह मुंबईला गेला होता.

मात्र कामाला वेळ झाल्याने त्यांना पुण्याला परत जाण्यासाठी उशिर झाला. त्यामुळे ते रात्री उशिरा मुंबईहुन पुण्यासाठी निघाले. दरम्यान मध्यरात्री 2 वाजताच्या सुमारास कसारा घाटात दुचाकीचे नियंत्रण सुटून त्यांची दुचाकी रस्त्याच्या कडेला असलेल्या डोंगरावर गेली. या अपघातात शुभमचा जागीच मृत्यू झाला तर त्याचा सहकारी गंभीर जखमी झाला. पोलीस घटनास्थळी पोहोचले. पंचनामा व तांत्रिक बाबीची पुर्तता करण्यात आली. आज पहाटे शुभमचे पार्थिव 11 वाजता वणी येथे पोहोचले. त्यानंतर लगेच मोक्षधाम येथे शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.

एकुलत्या एक मुलाचा दुर्दैवी मृत्यू
शुभमच्या लहान बहिणीचे लग्न झाले होते. बहिण व जावई पुण्याला राहतात. बहिण आणि जावई असल्याने शुभमने देखील बढती मिळाल्याने पुण्यात शिफ्ट होण्याचा निर्णय घेतला होता. तो बहिणीकडेच राहायचा. अलिकडे नोकरीला जोड व्यवसाय असावा म्हणून त्याने टूर ऍन्ड ट्रॅव्हल्स क्षेत्रात जाण्याचा निर्णय घेतला होता. त्याचे ट्रेनिंग असल्याने तो पुण्याहून मुंबईला गेला होता. ट्रेनिंग संपल्यानंतर परत येताना त्याच्यावर काळाने घाला घातला. एकुलता एक मुलगा गेल्याने आसुटकर कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. या अपघाती निधनाने परिसरात शोककळा पसरली आहे.

हे देखील वाचा: 

सावर्ला जवळ दुचाकीचा भीषण अपघात, 2 जागीच ठार, 1 गंभीर

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Comments are closed.