जितेंद्र कोठारी, वणी : जागतिक स्तरावर आणी भारतात 2010 पासून सतत वाढत चाललेले तापमान पाहता आणि अल निनोचा वाढता प्रभाव पाहता 2023 हे वर्ष सुद्धा उष्ण लहरी आणि अतिशय तापमान वाढीचे राहणार असल्याचे मत तज्ञांनी व्यक्त केले आहे. त्यामुळे नागरिकांनी मुख्यतः वृद्ध आणि लहान बाळांची काळजी घेणे गरजेचे आहे.
2022 सर्वाधिक उष्ण लहरीचे वर्ष
वर्ष 2022 मध्ये मार्च, एप्रिल, मे आणि जून महिन्यात अनेक उष्ण लहरी (लू)आल्या होत्या. गुजरात व राजस्थान मध्ये 29 ते 31 मार्च रोजी ऊष्ण लहरी तर 26 ते 30 एप्रिल दरम्यान विदर्भात उष्ण लहरीचा प्रभाव जाणवला. त्यानंतर 8 ते 15 मे आणि 3 ते 7 जून दरम्यान विदर्भात उष्ण लहरीचा प्रकोप पहावयास मिळाला होता. महाराष्ट्रातील अनेक शहरांचे तापमान 46 डिग्री पर्यन्त गेले होते. तर चंद्रपुर मध्ये तापमान 46.8 पर्यंत पोहचल्याची नोंद आहे.
ऐतिहासिक तापमान वाढ
1850 ते 1950 ह्या औद्योगिक काळाच्या पूर्वीचे तापमान पाहता इ.स.2000 नंतरची आकडेवारी पाहिल्यास लक्षात येते की 2000 मध्ये तापमान 0.67 अंशाने वाढले होते. 2005 मध्ये ते 0.91 झाले. 2010 मध्ये 0.97 अशाने वाढले तर 2014 मध्ये ते 1.00 डिग्रीने वाढले. 2014 नंतर प्रत्येक वर्षीचे तापमान 1 डिग्रीच्या वर गेलेले होते. गेल्या दोन दशकात सर्वाधिक तापमान वाढ ही 2016 मध्ये 1.28 डिग्रीने वाढले होते.(ह्याच वर्षी 19 मे रोजी राजस्थान मध्ये आतापर्यंतचे सर्वाधिक तापमान 51 डिग्री सेल्सिअस नोंदले गेले)
अल निनो चा प्रभाव
2020 पासून 2022 पर्यंत ला नीना चा प्रभाव होता. त्यामुळे देशात चांगला पाऊस पडला. परंतु 2023 च्या सुरवातीला सामान्य(न्युट्रल)स्थिती आली. पुढे अल निनो चा प्रभाव वाढणार असल्याचे नासा, जागतिक हवामान विभाग आणि इतर हवामान संस्थानी अभ्यासाअंती जाहीर केले आहे. अल निनोच्या दबावामुळे यंदाच्या उन्हाळ्यात तापमान वाढणार आहे. असे झाले तर 2023 हे वर्ष सुद्धा अत्यंत तापमानाचे वर्ष राहण्याची शक्यता हवामान अभ्यासक तसेच ग्रीन प्लानेट सोसायटीचे अध्यक्ष प्रा. सुरेश चोपणे यांनी व्यक्त केली आहे.
तापमान वाढीचे कारण….
अनियंत्रित जंगलतोड, शहरीकरण, औद्योगिकरण, प्रदूषण आणि विशेषत: वातावरणातील कर्बवायू चे प्रमाण (420 ppm )हे जागतिक पातळीवर तापमान आणि उष्ण लहरीस वाढण्यास कारणीभूत आहेत. दुचाकी, चारचाकी वाहनांची वाढती संख्या, एअर कंडीशनर (AC), मेट्रो आणि सिमेंट रस्तेही तापमान वाढण्यास कारणीभूत आहेत. विकासाच्या नावावर पर्यावरणाच विनाश होत असल्याने त्याचे परिणाम दिसू लागले आहे. त्यामुळे नागरिकांनी वेळीच सावध होणे आवश्यक आहे. पर्यावरण बचावासाठी पुढाकाराची गरज आहे
