जितेंद्र कोठारी, वणी: ट्रकखाली दुचाकी आल्याने त्यात दोघांचा जागीच ठार झाले. वणी-वरोरा रोडवरील गुंजचा मारोती जवळील संविधान चौकात हा भीषण अपघात झाला. दुपारी साडे तीन वाजताच्या दरम्यान ही घटना घडली. हा अपघात इतका भीषण होता की यात दुचाकीवरच्या दोघांचेही शरीर छिन्नविछिन्न झाले. अपघात घडताच ट्रकचालक घटनास्थळावरून पसार झाला आहे.
वणीनजीक वरोरा रोडवर गुंजचा नाला जवळ संविधान चौक आहे. येथून एक रस्ता वरोराकडे जातो, दुसरा वणीकडे व तिसरा रस्ता बायपास मार्गे यवतमाळच्या दिशेने जातो. या चौकाला संविधान चौक हे नाव दिले आहे. आज दुपारी 3.35 वाजताच्या दरम्यान एक दुचाकी (MH34 BM6011) एका व्यक्तीला सोबत घेऊन वरो-याकडून यवतमाळ बायपासकडे जात होती. त्याचवेळी एक ट्रक (MH34BG1525) देखील याच दिशेने जात होता.
चौकात असलेल्या सर्कलजवळून टर्न घेत असताना दुचाकीला ट्रकने मागून धडक दिली. या अपघातात दोघेही दुचाकीस्वार ट्रकच्या मधल्या चाकामध्ये आले. ट्रकचे चाक एकाच्या डोक्यावरून तर एकाच्या अंगावरून गेले. या भीषण अपघातात दोघांचाही जागीच मृत्यू झाला. दोघेही मृतांची ओळख पटलेली नसून त्यांचे वय 40 च्या आसपास असल्याचा प्राथमिक अंदाज आहे.
घटनेची माहिती होतात पीएसआय शिवाजी टिपूर्णे, हरिंदर भारती, विशाल गेडाम, शंकर चौधरी हे घटनास्थळी पोहोचले. त्यांनी ऍम्बुलन्स बोलवली. शिवा रायपूरे, योगेश रायपुरे, सौरभ नगराळे, पारस दुर्गे यांनी मृतदेह काढण्यास मदत केली. सध्या दोघांचाही मृतदेह ग्रामीण रुग्णालयात उत्तरीय तपासणीसाठी पाठवण्यात आला आहे. ट्रकचा ड्रायव्हर ट्रकची चावी घेऊन घटनास्थळावरून पसार झाला आहे. सध्या मृतांची ओळख पटवणे सुरू आहे. घटनेचा वणी पोलीस तपास करीत आहे.
(अधिक माहिती येताच ही बातमी अपडेट केली जाईल)
हे देखील वाचा:
मिलन लुथरियांचा बहुचर्चीत तडप सिनेमा आज प्रेक्षकांच्या भेटीला…
Comments are closed.