पुन्हा एका गंभीर अपघातात इसमाचा मृत्यू

मारेगाव जवळील मांगरुळ येथील घटना

विवेक तोटेवार, वणी: शहर आणि परिसरात अपघातांचे सत्र सुरूच आहे. पुन्हा गुरुवार दिनांक 28 मार्चला रात्री 8.30 च्या सुमारास एका अज्ञात वाहनाने वणीतील दैनिक अभिकर्ता राजेश नरसिंग पुण्यानी (53) यांना धडक दिली. मारेगाव जवळील मांगरूळ जवळ झालेल्या या अपघातात त्यांचा मृत्यू झाला. या अपघातात आधी राजेश हे गंभीर जखमी झालेत. नंतर उपचारादरम्यान त्यांचा नागपूर येथे मृत्यू झाला आहे. अतिशय मनमिळावू स्वभावाचे असलेल्या राजेश यांच्या आकस्मिक मृत्यूने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

राजेश हे विविध मल्टिस्टेट बँकेत व पतसंस्थेत दैनिक अभिकर्ता म्हणून काम करीत होते. गुरुवार दिनांक 28 मार्च रोजी ते वणीवरून राजूर येथे वसुली करून मारेगाव येथे जात होते. जाताना मारेगाव जवळील मांगरुळ येथे त्यांना फोन आला. ते आपली दुचाकी रस्त्याच्या कडेला लावून बोलत होते. अचानक एका भरधाव वाहनाने त्यांच्या दुचाकीला धडक दिली. या धडकेत राजेश हे दूर फेकले गेले आणि गंभीर जखमी झाले.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

त्यांना सुरवातीला मारेगाव येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले. त्यानंतर वणीच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्रकृती गंभीर असल्याने त्यांना नागपूर येथे हलवण्यात आले, मात्र त्यांचा वाटेतच मृत्यू झाला. त्यांच्या मागे पत्नी, दोन मुले, दोन भाऊ, आई असा आप्तपरिवार आहे. ते संयुक्त कुटुंबात राहत असल्याची माहिती आहे. त्यांचा मुलगा हा सीए द्वितीय वर्षाला आहे. मुलगी ही बंगलोरला एका कंपनीत सॉफ्टवेअर अभियंता असल्याची माहिती आहे. त्यांच्या जाण्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

Comments are closed.