पुरुषोत्तम नवघरे, वणी: शहरातील आदर्श हायस्कूलच्या नानासाहेब गोहोकर रंगमंचावर ‘आनंददायी शनिवार’ उपक्रमांतर्गत ‘टाकाऊ पासून टिकाऊ’ हा अनोखा उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमात विद्यार्थ्यांनी टाकाऊ वस्तूंपासून समाजोपयोगी आणि टिकाऊ वस्तूंची निर्मिती करून सर्जनशीलतेचा उत्कृष्ट नमुना सादर केला.
उपक्रमाची सुरुवात सेवानिवृत्त प्रयोगशाळा सहाय्यक विजय गंधेवार यांनी ‘नमस्कार माझा या ज्ञानमंदिरा’ या गीताने केली. त्यांनी टाकाऊ वस्तूंमुळे पर्यावरणावर होणाऱ्या दुष्परिणामांवर प्रकाश टाकला. विशेषतः थर्माकोल आणि पातळ प्लास्टिक कॅरिबॅगचे विघटन न होणे आणि जनावरांच्या आरोग्यावर होणारा परिणाम याबाबत सविस्तर माहिती दिली. प्लास्टिकचा वापर कमी करणे, त्याचा पुनर्वापर करणे आणि थर्माकोलपासून उपयुक्त वस्तूंची निर्मिती कशी करावी याबाबत त्यांनी विद्यार्थ्यांचे मार्गदर्शन केले.
विद्यार्थ्यांनी कॅरिबॅगपासून वीट, टाकाऊ पत्रिकेपासून ग्रीटिंग कार्ड, सलाइनच्या बाटलीपासून झाड, फूल, पान आणि फ्लॉवरपॉट, तसेच पेन कव्हरपासून टूथब्रश, पंचिंग पट्ट्या आणि काचेच्या तुकड्यांपासून नेम प्लेट, सुविचार आणि सुभाषित तयार करण्याच्या तंत्रांचा प्रत्यक्ष प्रात्यक्षिकाद्वारे अभ्यास केला. या उपक्रमातून विद्यार्थ्यांमध्ये बौद्धिक कल्पकता, सर्जनशीलता, नवनिर्मिती आणि रचनात्मक प्रक्रियेची आवड वृद्धिंगत झाली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य आर. एल. मोहिते होते, तर पर्यवेक्षक एस. आर. पिदुरकर यांनी विशेष अतिथी म्हणून उपस्थिती लावली. सूत्रसंचालन वैजनाथ खडसे यांनी केले. यशस्वी आयोजनासाठी सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी मोलाचे सहकार्य केले.
हा उपक्रम पर्यावरण संरक्षण आणि सर्जनशीलतेच्या दृष्टीने एक पाऊल पुढे टाकणारा ठरला असून, विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरण जागरूकतेचा संदेश प्रभावीपणे पोहोचवण्यात यशस्वी झाला.



Comments are closed.