अन् चक्क पोलीस स्टेशनमध्येच निघाला कोब्रा!

सर्पमित्राचे रेस्क्यू ऑपरेशन, नागाला जीवनदान

पुरुषोत्तम नवघरे, वणी: मुकुटबन पोलीस स्टेशन परिसरात शनिवारी, 6 सप्टेंबर रोजी दुपारी 3 वाजता एका विषारी कोब्रा (नाग) आढळला. पोलीस कर्मचाऱ्यांनी तात्काळ सतर्कता दाखवत जीवनसृष्टी सामाजिक बहुद्देशीय संस्थेचे प्रसिद्ध सर्पमित्र जगदीश कुडलवार यांना संपर्क केला. जगदीश यांनी वेळ न दवडता घटनास्थळी धाव घेत कोब्रा सापाला अत्यंत कौशल्याने आणि सुरक्षितपणे पकडले.

पकडलेल्या कोब्रा सापाची वन विभागात नोंद करून त्याला जंगलात नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले. सर्पमित्र जगदीश कुडलवार यांनी आतापर्यंत अनेक विषारी, निमविषारी आणि बिनविषारी सापांना पकडले आहे. वन विभागात रीतसर नोंदणी करत त्यांना जंगलात सुरक्षितपणे सोडले आहे.

या रेस्क्यू ऑपरेशनमध्ये सर्पमित्र हरीश कापसे, गजानन क्षीरसागर, अविनाश हीवलेकर, तोहीद शेख, सुरज नथ्थुजी पारशिवे, मनोज मोंढे, अर्जुन राठोड, आर्यन कवाडे, कार्तिक नाईनवार, सोयल सय्यद आणि संकेत परचके यांनी सहभाग घेतला. पोलीस स्टेशनचे कर्मचारी बादल जाधव, बिट जमादार प्रकाश गोरलेवार यांच्यासह संपूर्ण कर्मचारी वर्ग आणि वन विभागाचे कर्मचारी उपस्थित होते.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

परिसरात साप निघाल्यास परिसरातील सर्पमित्राला किंवा 93734 62024 (हरीश कापसे) यांना संपर्क साधावा,असे आवाहन संस्थेतर्फे करण्यात आले आहे

Comments are closed.