सुशील ओझा, झरी: झरी तालुक्यातील अडेगाव या गावातील एक तरुण सध्या स्वखर्चातून स्वतःच्या घरातून जनजागृती करीत आहे. त्याची ही जनजागृती करण्याची अनोखी शक्कल सध्या परिसरात चर्चेचा विषय ठरत आहे. घरावर लाऊस्पिकर लावून तो सकाळ संध्याकाळ लोकांमध्ये जनजागृती व्हावी यासाठी प्रयत्न करतो.
अडेगावातील या तरुणाचे नाव आहे प्रशांत बोबडे. एकीकडे लोक घराबाहेर निघून संचारबंदीचे उल्लंघन करीत आहे तर दुसरी कडे प्रशांत घरातूनच जनजागृती करतोय. त्याने स्वतःच्या घरावर एक स्पीकर लावला असून तो त्याद्वारा जनजागृती करतोय.
कोरोना या संसर्गजन्य रोगाची लागण कशी होते, या आजाराचे लक्षण कोणते, त्याचे परिणाम काय, हा आजार होऊ नये म्हणून या साठी नागरिकांनी कोणती काळजी घ्यावी. स्वच्छतेचे महत्त्व, देश विदेशातील कोरोनाविषयी अपडेट हा युवक रोज सकाळ संध्याकाळ नागरिकांना देत असतो.
सध्या जगात कोरोना या महामारीने थैमान घातले असून चिंतेचे आणि भीतीचे वातावरण गावा- गावात निर्माण झाले आहे. देशात लॉकडाऊन व संचारबंदीमुळे बाहेर पडता येत नसल्याने या आजारविषयी लोकांनमध्ये जनजागृती व्हावी व या आजाराचे गांभीर्य लक्षात यावे यासाठी प्रशांत जे प्रयत्न करतोय त्याचे परिसरात कौतुक होत आहे.