धोंड्याचा महिना आला गं बाई…..

16 मे पासून अधिकमास, मलमास, पुरुषोत्तम मास आरंभ

0

ब्युरो, यवतमाळ: 16 मे 2018पासून अधिकमास लागतोय. याला मलमास, पुरुषोत्तम मास आणि महाराष्ट्रात धोंडामास असेही म्हणतात. चांद्र वर्ष व सौर वर्ष यांचा मेळ घालण्यासाठी सरासरी वर्गास किंवा तेहतीस चांद्रमासानंतर चांद्र वर्षात जी एक अधिक महिना धरावा लागतो. त्याला अधिकमास म्हणतात. सामान्यतः प्रत्येक चांद्र मासात एक सौर संक्रांती होत असते. ज्या मासात अशी एकही सौर संक्रांती घडत नाही, म्हणजेच जो चांद्रमास संपूर्णपणे दोन संक्रांतीच्या दरम्यान येतो, तो अधिकमास समजायचा. ज्या सूर्याची मेषसंक्रांती चैत्र अमावस्येला घडली व त्याची वृषभ संक्रांती वैशाखात न होता ती त्यापुढील महिन्याच्या प्रतिपदेस घडली, तर हा संक्रांतीविहीन मास अधिक वैशाख ठरेल व त्यापुढचा महिना तर निज वैशाख होईल.
चैत्र, ज्येष्ठ व श्रावण हे १२ वर्षांनी, आषाढ १८ वर्षांनी, भाद्रपद २४ वर्षांनी, आश्विन १४१ वर्षांनी व कार्तिक ७०० वर्षांनी अधिक मास होतो. भाद्रपदापर्यंतच्या मासांना अधिक मास म्हणतात. आश्विन व कार्तिक अधिक झाले, तरी त्यास तसे म्हणत नाहीत. ज्या वर्षी आश्विन अधिक होतो, त्या वर्षी पौष क्षयमास होतो. अशावेळी दोन प्रहारापर्यंत मार्गशीर्ष व दोन प्रहरानंतर पौष मानून दोन्ही मासांची धर्मकृत्ये एकाच महिन्यात करतात. या जोड मासाला संसर्प असे म्हणतात. कार्तिकपुढील चार महिने अधिकमास होत नाहीत व आश्विनाच्या पूर्वी होत नाही.

हिंदू पंचांगाप्रमाणे चांद्रमासाचे ३५५ दिवसांचे वर्ष असते. परंतु इंग्रजी व भारतीय सौरवर्ष ३६५ दिवसांचे असते. म्हणजेच प्रतिवर्षी ११ दिवस चांद्रमास वर्षात सौरवर्षापेक्षा कमी असतात आणि हा ११ दिवसांचा फरक काढून दोन्ही वर्षात मेळ घालण्यासाठी प्राचीन शास्त्रकारांनी दर तीन वर्षांनी (अचूकपणे सांगावयाचे झाल्यास ३२ महिने १६ दिवसांनी) एक महिना अधिक धरावा असे सांगितले आहे. दर महिन्याला सूर्य एका राशीतून संक्रमण करतो परंतु या अधिक तेराव्या महिन्यात सूर्याचे संक्रमण नसते म्हणून याला मलमास असेसुद्धा म्हणतात. त्यास पुढील चांद्रमासाचे नाव देतात.

चैत्रापासून अश्विनपर्यंतच्या ७ मासांपैकीच एखादा अधिक मास असतो. कारण या काळात सूर्याची गती मंद असते. म्हणून सूर्यास एका राशीतून दुसर्या राशीत जाण्यास ३० दिवसांपेक्षा कमी काळ लागतो. एकदा आलेला अधिकमास पुन्हा १९ वर्षांनी येतो.

बृहत्रारदीय व पद्म या पुराणात पुरुषोत्तममास माहात्म्य व मलमास माहात्म्य या प्रकरणात अधिकमासाचे महत्व वर्णिले आहे. त्यात अधिक मासात करायची व्रते, दाने, उद्यापने यांचा विधी सांगितला असून, फलश्रुतीही निवेदिली आहे. या मासाची देवता पुरुषोत्तम म्हणजे विष्णू ही मानली असून, त्याच्या कृपेसाठी पुढील कृत्य करण्यास सांगितले आहे.

पूजा, पापक्षालनासाठी मलमासव्रत, प्रत्येक दिवशी अनरसे इ. पक्वान्ने तेहतीस या संख्येने कांस्यपात्रात भरून पात्रासह त्यांचे दान, पादत्राणे व छत्री यांचे दान, सुवर्णदक्षिणा इत्यादी.
महाराष्ट्रात अधिकमासातले अनरशांचे वाण बहुधा जावयाला देतात. कन्या व जामात यांना लक्ष्मीनारायणस्वरूपी मानले आहे. त्यातून ही पद्धत आली असावी. जी कर्मे अन्य वेळी करणे शक्य असेल, ती अधिकमासात वर्ज्य सांगितली आहेत उदा. अध्याधान, देवप्रतिष्ठा, राज्याभिषेक, विवाहोपनयनादी संस्कार, गृहारंभ, गृहाप्रवेश, देशांतर यात्रा इ.
अधिकमासात मृत झालेल्यांचे श्राद्ध व महालय, शुद्ध मासात त्या तिथीस करतात. अधिकमासात जन्मलेल्या बालकाचा जन्मास त्या नावाचा शुद्ध मास असेल तो धरतात.

अधिक महिन्याची पोथी शुद्ध सात्विक मनाने रोज एक अध्याय याप्रमाणे महिनाभर वाचून शेवटी उद्यापनाच्या वेळी ब्राह्मणाला दान द्यावी. पोथी वाचन न जमल्यास निदान श्रवण तरी करावी. त्यामुळे भगवान पुरुषोत्तम श्रीनारायण प्रसन्न होतो आणि भक्तांचे कल्याण करतो. अधिक मासात केलेल्या पूजेचे तीर्थयात्रेचे फळ अनेक पटींनी मिळते. स्त्रीयांना अखंड सौभाग्याचा व पूत्रपौत्रांचा लाभ होतो. अधिकमासात उपोषणाला विशेष महत्व आहे. उपोषणाचे प्रकार एकभुक्त (दिवसातून एकवेळ जेवावे व एकवेळ उपवास करावा.) अयाचित (अकस्मात दुसर्याआकडे जेवायला जाणे.) उपोषण – पूर्ण उपवास. अशक्त मनुष्याने वरीलपैकी एखादा प्रकार तीन दिवस तरी करावा. न जमल्यास निदान एक दिवस तरी करावा. महिनाभर तांबूलदान दिल्यास स्त्रियांना अखंड सौभाग्यप्राप्ती होते. महिनाभर अखंड दीप लावल्यास लक्ष्मीप्राप्ती होते. महिन्यातून निदान एक दिवस तरी गंगास्नान केल्यास सर्वपापापासून मुक्ती मिळते. महिनाभर जेवताना मौन पाळल्यास पापांचे निरसन होते. अधिकमासात नित्य कर्मे करावीत त्यापासून दूर जाऊ नये. काम्य कर्मे करून नयेत. जे केल्यावाचून गत्यंतर नाही अशी कर्मे अवश्य करावीत. साभार.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Leave A Reply

Your email address will not be published.