15 ऑगस्टपासून आदिवासींच्या हक्कासाठी संघर्ष यात्रा

हक्कांसाठी हजारों आदिवासी बांधव उतरणार रस्त्यावर

0

निकेश जिलठे, वणी: जल जमीन जंगल यांची आम्ही सेवा केली. या मातीचे आम्ही खरे वारस आहोत. आम्ही आमच्या जीवाची पर्वा न करता याचं रक्षण केलं. निसर्गातील प्रत्येक घटक आमच्या घरातील सदस्य आहे. आम्हाला कोणत्या बंधनात लादू नका. आमच्या हक्कांवर गदा आणू नका. आम्ही निसर्ग आहोत. निसर्गाचा उद्रेक हा ज्वालामुखीसारका बाहेर पडतो. आमच्यावर अन्यायकारक अटी लादून आमचे हक्क हिसकावून घ्याल, तर आम्ही वादळ होऊ, असा इशारा वणी विधानसभा क्षेत्रातील आदिवासी बांधवांनी सरकारला दिला आहे.

मुख्यमंत्र्यांनी नुकतच पेसा कायद्याचे आरक्षण कमी करून ते 50 टक्के करणार असल्याचे जाहीर केले. त्यामुळे आदिवासी बांधवांमध्ये असुरक्षीतेची भावना निर्माण झाली असून याविरोधात वणी, मारेगाव व झरी तालुक्यातील आदिवासी बांधवांनी एल्गार पुकारला आहे. गुरुवारी 15 ऑगस्ट रोजी स्वातंत्रदिनाच्या दिवशी आदिवासी बांधवांचा सैलाब रस्त्यावर उतरणार आहे. सकाळी 10 वाजता वणीतील भिमालपेन देवस्थान येथून ही संघर्ष यात्रा निघणार निघून मारेगाव तालुक्यात जाणार आहे. दुस-या दिवशी मारेगाव तालुक्यातून निघून झरी येथे या यात्रेचा समारोप होणार आहे. आदिवासी हक्क संरक्षण समितीच्या वतीने या संघर्ष यात्रेचे आयोजन करण्यात आले असून आदिवासी मित्र पुरस्कार प्राप्त डॉ. महेंद्र लोढा हे या यात्रेचे नेतृत्व करणार आहे.

स्वातंत्र्याच्या 72 वर्षानंतरही गावकुसात राहणारा आदिवासी समाज आजही प्रतिकुल परिस्थितीत जगत आहे. विकासाची गंगा त्यांच्यापर्यंत अद्यापही पोहोचलेली नाही. आदिवासी बांधवांच्या विकासासाठी व संरक्षणासाठी विविध कायदे आणि योजना आहेत. मात्र त्याची अंमलबजावणी करण्यात प्रशासन सपशेल अपयशी ठरले आहे. त्यातच नुकतेच मुख्यमंत्री देवेद्र फडणवीस यांनी पेसा कायद्याचे आरक्षण 50 टक्के पेक्षा कमी करण्याची घोषणा केली. याविरोधात आदिवासी बांधवांमध्ये संतापाचे वातावरण आहे. तसेच आदिवासी समाजासाठी असलेल्या वनहक्क कायद्याची अंमलबजावणी करण्यासही सरकार अपयशी ठरले आहे. त्यामुळे अखेर आदिवासी समाजाने या विरोधात दंड थोपटले असून सरकारच्या या जुलमी घोषणेविरोधात यात्रेचे आयोजन करून रस्त्यावर उतरण्याचा निर्णय घेतला आहे.

आदिवासींच्या कल्याणासाठी सरकारने पंचायत राज विस्तार (पेसा) आणि अनुसूचित जमाती व इतर पारंपारिक वन निवासी (वनहक्कांची मान्यता) असे दोन कायदे लागू केले आहेत. या कायद्यानुसार आदिवासींना वैयक्तीक तसेच सामूहिक वनहक्क मिळाले आहेत. मात्र या कायद्याची अंमलबजावणी केली जात नाही. त्यामुळे पेसा कायद्याची कडक अंमल बजावणी करा. अनुसुची 5 व 6 संपूर्ण राज्यात लागू करा. वनहक्क कायद्याची कठोर अंमलबजावणी करा. आदिवासी बहुल गावात वीज, पाणी, रस्ता , आरोग्य, शिक्षण, निवारा व रोजगाराच्या सोयी उपलब्ध कराव्यात. तसेच जागतिक आदिवासी दिनाला संपूर्ण राज्यात सुटी जाहीर करावी अशा मागण्या संघर्ष समितीद्वारे करण्यात आल्या आहेत.

संघर्ष यात्रेला गुरुवारी सकाळी 10 वाजता भिमालपेन देवस्थानातून सुरूवात होणार आहे. ही यात्रा आधी वणीतील प्रमुख मार्गाने फिरून चिखलगाव मारेगाव तालुक्यातील मांगरुळ येथे पोहोचणार. तिथे यात्रेचा मुक्काम आहे. दुस-या दिवशी सकाळी 7 वाजता ही यात्रा मांगरुळ वरून मारेगाव येथे जाणार. सकाळी 9 वाजता मारेगाव येथे जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले आहे. सभेनंतर ही यात्रा मारेगाववरून घोन्सा मार्गे झरी येथे जाणार आहे. झरी इथे संघर्ष यात्रेचा समारोप होणार आहे.

आदिवासी बांधवांवर अन्याय होऊ देणार नाही – डॉ. महेंद्र लोढा

पेसा हा कायदा आदिवासी बांधवांच्या संरक्षणासाठी आहे. आदिवासींच्या पाड्यावर आदिवासी बांधवांचा हक्क आहे. मात्र मुख्यमंत्र्यांनी पेसा क्षेत्रातील आरक्षण कमी करण्याची घोषणा ही आदिवासी बांधवांवर अन्याय आहे. आदिवासी बांधवांवर कधीच इंग्रजांचं शासन नव्हतं. मात्र देश स्वतंत्र झाल्यानंतर त्यांना त्यांच्याच जमिनीवरून हाकलून लावलं जात आहे. आधीच आदिवासी भाग विकासापासून कोसो असताना सरकार तुघलकी आदेश काढते हे आदिवासी बांधवांवर अन्याय असून त्यांच्या हक्कावर बाधा आणणारा आहे. 

या संघर्ष यात्रेत मोठ्या संख्येने सहभागी व्हा असे आवाहन संतोष चांदेकर, स्वप्निल धुर्वे, डॉ. सुनील जुमनाके, ऍड अरविंद सिडाम, राजू तुमराम, शंकर किनाके, अजय राजगडकर, मंगेश कोकाटे, बाबाराव गेडाम, कपील कोटनाके, गजानन मडावी, बंडू परचाके, भगवान आत्राम, अशोक राजगडकर, जगदीश मेश्राम, लक्ष्मण आत्राम, प्रवीण सालोरकर (वणी) तुकाराम आत्राम, आत्माराम आत्राम, विनोद मडावी, अंकुश मेश्राम, जीवन तोडासे, इरफान खान, मदन गेडाम, पांडुरंग पोयाम, मनोहर कुमरे, अंकुश नेहारे, किसन कुळमेथे, रामराव आत्राम, योगेश मडावी, पैकु आत्राम, रणजीत तोडसाम, सुरेश आत्राम, श्रावण मडावी, बाबुलाल किनाके, महादेव नाईक, बंडू आडे, शेखर सिडाम (झरी) आनंदराव मसराम, बळीराम आत्राम, सुदर्शन टेकाम, सुनील आत्राम, गंगाधर लोनसावळे, विकास जुनगरी, रामपाल रामपुरे, दिनकर जुनगरी, पोतू बोंदरे, विष्णू मेटकर, राजू वडदे, वाघू आत्राम, बंडू येरणे, विलास आत्राम, गणेश लोणसावळे, शँकर बोंदरे, तुकाराम दडांजे, प्रभाकर मडावी, दिपक आत्राम, शेषराव आत्राम, हरी रामपुरे, हुसेन ढोबळे (मारेगाव) यांनी केले आहे.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Leave A Reply

Your email address will not be published.