विलास ताजने, वणी: सध्या बाजारात कापसाचे भाव दररोज वाढत आहे. सहा हजार रुपयांपर्यंत मजल मारली आहे. दर साडे सहा हजारांवर जाणार असल्याचे अंदाज वर्तविले जात आहे. चढ्या दराचा फायदा हा शेतकऱ्यांना होत असल्याचा गवगवा सत्ताधाऱ्यांकडून होत आहे. मात्र हा केवळ दिखावा आहे. खरे पाहता शेतकऱ्यांच्या कष्टावर व्यापाऱ्यांचीच चांदी होत असल्याचे वास्तव आहे.
यंदाचा हंगाम सुरुवातीपासूनच शेतकऱ्यांना डोकेदुखी ठरला आहे. पावसाच्या लहरीपणाचा फटका पिकांच्या पेरणी, टोबनी पासूनच बसला. यंदा सात जून पासून पावसाला सुरुवात झाली. सतत चार दिवस बरसल्यानंतर दहा जून पासून पावसाने दडी मारली. या कालावधीत ज्या शेतकऱ्यांनी घाईगडबडीत कापूस बियाण्याची टोबनी केली. त्यांच्या शेतात पिके उगवली. पाऊस सुरू राहील या आशेने पेरणीची कामे अखंडपणे चालू होती. मात्र अकरा जून पासून पावसाने दडी मारली. मग पावसाच्या लपंडाविचा खेळ सुरू झाला. टोबनी संपली की संततधार पाऊस बरसायचा. परिणामी शेतकऱ्यांना दुबार, तिबार पेरणीला तोंड द्यावे लागले. मात्र खरिपाच्या पेरण्या समाधानकारक झाल्या नाही.
संततधार पावसाने पिकात मशागतीची कामे करणे कठीण झाले होते. त्यामुळे तणनाशक, निंदनावरचा खर्च वाढला. पिके तणमुक्त होऊन खत पेरणीची कामे पूर्ण होताच पावसाने ऑगस्ट अखेरीस कायमची दडी मारली. परिणामी कापूस, सोयाबीन आदी पिकांची वाढ खुंटली. त्याचा परिणाम फळधारणा कमी होण्यावर झाला. सप्टेंबर महिन्यात कापूस वेचणीला सुरुवात झाली. अनेकांच्या कापूस पिकांची एकाच वेचणीत उलंगवाडी झाली. एकरी उत्पादन केवळ दोन ते पाच क्विंटल निघाले. खरेदीच्या प्रारंभी कापसाचे दर प्रती क्विंटल साडे पाच हजार ते पाच हजार नऊशे पर्यंत होते. महिना दिडमहिना दर कायम होते. परंतु सहज वाढलेले कापसाचे दर अल्प उत्पादनामुळे पुन्हा वाढतील या भोळ्या आशेने शेतकऱ्यांनी कापूस साठवून ठेवला.
मध्यंतरी बाहेर देशात कापसाचे उत्पादन भरघोस झाले, तणावाची स्थिती असल्याने पाकिस्तानची निर्यात बंद आहे आदी कारणे पुढे करीत कापसाचे दर पडले. मात्र मार्च महिना सुरू होऊनही अपेक्षित वाढ होत नव्हती. मार्च अखेरीस बँकांचे पिक कर्ज भरणे, हात उचल देणे, मुलामुलींचे लग्न आदी कामे असल्याने शेतकऱ्यांनी मिळेल त्या दरात कापूस विकला. यावेळी हमी भावापेक्षाही कमी दरात व्यापाऱ्यांनी खरेदी केली.
हमी भावापेक्षा कमी दरात शेतकऱ्यांचा शेतमाल खरेदी करणाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात येईल. अशा बोंबा मारणाऱ्या शासकीय यंत्रणेने मात्र शेतकरी तक्रार होऊनही एकाही व्यापाऱ्यावर कार्यवाही करण्याची हिम्मत दाखवली नाही. परिणामी शेतकरी पुरता लुटला गेला. मार्च महिन्याच्या अखेरीस कापसाचे भाव वाढले. मात्र याचा फायदा दोन चार टक्के शेतकऱ्यांनाच होताना दिसून येतो.
खरे पाहता शेतकऱ्यांच्या कष्टावर व्यापाऱ्यांची चांदी होत आहे. शेतकऱ्यांच्या घरी शेतमाल असे पर्यंत भाव वाढत नाही. मात्र तोच माल व्यापाऱ्यांकडे गेला की आपोआपच भाववाढ होते. मग सरकार शेतकऱ्यांच्या हिताचं की व्यापाऱ्यांच्या हे समजण्याइतपत शेतकरी निश्चितच खुळा नाही एवढं मात्र खरं !