काँग्रेसनंतर आता शिवसेनेचेही आमदारांविरोधात तक्रार
सोशल डिस्टन्सिंगचा विसर प्रकरणात आता सेनेची उडी
विवेक तोटेवार, वणी: वणी शहरात मागील काही दिवसांपासून सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडत असल्याचा गवगवा केल्या जात होता. मदयविक्री सुरु असताना सोशल डिस्टंन्सिंगगचे पालन होत नसल्याची तक्रार आमदारांनी जिल्हाधिकारी यांचे कडे केली होती. मात्र आता चक्क आमदारांनाच सोशल डिस्टंसींगचा विसर पडल्याबाबत काँग्रेसने तक्रार केली होती. त्यानंतर आता शिवसेनेनेही आता या प्रकरणात उडी घेतली असून सोशल डिस्टन्सिंग न पाळणारे आमदार व त्यांच्या सहका-यांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
कोरोना विषाणूजन्य आजाराचा मोठया प्रमाणात प्रसार होत असल्याने याला प्रतिबंध घालण्याकरीता शासनाने अनेक मानकांची घोषणा केली आहे. यामध्ये नागरीकांनी सार्वजनीक ठिकाणी वावरतांना 1 मिटर अंतर ठेवण्याच्या सुचना दिल्या आहेत तर मास्कचा वापर अनिवार्य करण्यात आला आहे. याचे उल्लंघन करणा-यां नागरीकांवर आपत्ती निवारण कायदयान्वये कारवाई करण्यात येत आहे. या कारवाई मुळे अनेक नागरीकांनी प्रशासना विरुध्द नाराजी व्यक्त केली आहे.
19 मेला कोराना संकट हाताळण्यात राज्य सरकार अपयशी ठरल्याचा आरोप करीत भारतीय जनता पार्टीच्या वतीने आ. संजीवरेडडी बोदकुरवार यांच्या नेतृत्त्वात निवेदन देण्याकरीता आपल्या दहा ते पंधरा कार्यकर्त्यांसह उपविभागीय अधिकारी कार्यालयात उपस्थित झाले होते. यावेळी कार्यकरत्यांसह सोशल डिस्टन्सिंगचे कोणतेही भान न ठेवता उपविभागीय अधिकारी यांचे कक्षात प्रवेश करुन निवेदन देण्यात आले होते.
याप्रसंगी काढण्यात आलेले छायाचित्र सोशल मिडीयावर प्रसारीत झाल्याने चांगलीच खळबळ उडाली. आमदारच सोशल डिस्टसींगचे पालन करीत नसल्याचा आरोप सुरू होता. याबाबत काँग्रेस कमिटीच्या वतीने उपविभागीय अधिकारी व उपविभागीय पोलीस अधिकारी यांचे कडे तक्रार केल्यानंतर आता शिवसेनेनेही या प्रकरणी निवेदन देत कार्यवाहीची मागणी केली आहे.
या प्रकरणी आज शिवसेनेचे जिल्हा प्रमुख विश्वास नांदेकर यांच्यातर्फे उपविभागीय अधिका-यांना निवेदन देण्यात आले. निवेदनावर रवि बोढेकर, विक्रांत चचडा, महेश चौधरी, नरेंद्र ताजणे यांच्या सही आहेत.