नगरपालिका निवडणूक 2025: कोण ठरला सरस, कोण कुठे पडला मागे?

विकास व्हिजन की मास व्होटींग? मतविभाजन बिघडवणार विजयाचे गणित?

निकेश जिलठे, वणी: अखेर 9 वर्षांनी नगरपालिकेची निवडणूक पार पडली. निकालाला पहिल्यांदाच उशिर होत असल्याने निकालाची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.  2011 च्या नगरपालिकेच्या निवडणुकीत पाणी समस्येवर धावून आल्यामुळे मतदारांनी मनसेवर विश्वास टाकला. ही लाट इतकी जबर होती की काही सामान्य उमेदवार देखील मोठ्या मतधिक्याने निवडून आलेत. त्यानंतर 2016 च्या  नगरपालिकेच्या निवडणुकीत परिवर्तनाची आणि भाजपला सत्तेत आणण्याची लाट निर्माण झाली. याचे एकमेव कारण म्हणजे केंद्रात व राज्यात भाजपची सत्ता होती. तसेच वणी विधानसभा देखील भाजपच्या ताब्यात होती. त्यामुळे वणीकर मतदारांनी एकहाती भाजपच्या हाती सत्ता देण्याचा निर्णय घेतला. भाजपने अभूतपूर्व यश मिळवत इतर पक्षांचा सुपडा साफ केला.

मात्र यावेळी मतदारांमध्ये ना परिवर्तनाची लाट दिसून आली. ना कुणाची हवा दिसून आली. सुप्त लाट देखील लुप्त झाली. त्यातच आरक्षण आल्याने अनेक दिग्गज उमेदवारांचा भ्रमनिरास झाला. मनसेने निवडणुकीतून काढलेले अंग किंवा संजय खाडे यांनी घेतलेली सावध भूमिका. अपक्ष उमेदवारांना मिळालेला प्रचाराचा अपुरा वेळ इत्यादी कारणांचा एकत्रीत परिणाम म्हणून केवळ नेत्यांमध्ये नाही तर मतदारांमध्येही निरस आणि निरुत्साही वातावरण सुरुवातीपासूनच राहिले. या सर्व वातावरणातही भाजप, शिवसेना, शिवसेना (उबाठा) व इतर पक्ष जोमाने निवडणूक लढले. लाट किंवा हवा असल्यास मतदानानंतर अर्धे अधिक चित्र स्पष्ट होते. मात्र असे काहीच दिसून न आल्याने यावेळी ही निवडणूक अतितटीची ठरतये. या निवडणुकीत कोणता पक्ष किंवा उमेदवार कुठे सरस ठरला व कुठे मागे पडला याचा आढावा घेण्याचा आपण प्रयत्न करू.

सुपरिचित विरुद्ध अपरिचित लढाई
नगराध्यक्ष पदाचे आरक्षण जाहीर होताच डॉ. संचिता विजय नगराळे यांचे नाव नगराध्यक्ष पदासाठी चर्चेत आले. त्यामुळे इच्छुक उमेदवार म्हणून महिनाभरात हे नाव सर्वसामान्यांपर्यंत पोहोचले. तसेच वैद्यकीय व्यवसायामुळे डॉ. नगराळे यांचे नाव आधीच सुपरिचित होते. परिचित, उच्चशिक्षित उमेदवार निवडणुकीत उतरवल्याने तसेच संपूर्ण महिना उमेदवाराचे नाव मतदारांमध्ये पोहचवण्याचा फायदा शिवसेना उबाठा – महाविकास आघाडीला झाला. तर दुसरी कडे भाजपचा उमेदवार अखेरच्या क्षणी ठरला. ज्या परिसरात उमेदवार राहत होते. त्याच वार्डातील अधिकाधिक मतदारांना उमेदवार त्यांच्या भागातील आहे हे माहिती नव्हते. त्यामुळे उमेदवार निवडीत उबाठाच्या उमेदवाराने आघाडी घेतली.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

भाजपची प्रचारात आघाडी
उत्तम नियोजन, प्रत्येक प्रभागाच्या प्रचारासाठी प्रभारीची निवड, मा. आ. संजीवरेड्डी यांनी पायाला भिंगरी लावून प्रचार केला. निडवणुकीच्या आधीच भाजपने प्रचार प्रभारी निवडला. निवडणूक काळात प्रचार प्रभारी हा क्वचितच प्रभागाबाहेर दिसत होता. यातील अनेक प्रभारींनी निवडणूक जवळून पाहिली असल्याने त्याचा भाजपच्या उमेदवारांना मोठा फायदा झाला. यासह संपूर्ण निवडणूक काळात भाजपचे शिस्तबद्ध काम चालले. धुंवाधार प्रचार, सभा, रॅली, कार्यकर्ते यांचे परिश्रम यामुळे प्रचारात भाजपने आघाडी घेतली.

यासह अखेरचा काळ हा भाजपसाठी महत्त्वाचा ठरला. मंत्री चंद्रशेखऱ बावनकुळे यांची जाहीर सभा व शक्तीप्रदर्शन रॅली याने प्रचार तसेच मतदार व कार्यकर्त्यांचा उत्साह शिगेला पोहचवला. याचा फायदा भाजपच्या उमेदवारांना झाला. आधी काहीशी पिछाडीवर असलेल्या भाजपच्या उमेदवार विद्या आत्राम यांनी अखेरच्या दिवशी अचानक मुसंडी मारली. त्याचा फायदा नगरसेवक पदाच्या उमेदवारांना देखील झाला. प्रचार, नियोजन व मतदारांमध्ये शेवटच्या क्षणी आघाडी घेण्यात भाजपला यश आले. याउलट शेवटच्या क्षणी कोणतीही मोठी सभा किंवा शक्तीप्रदर्शन रॅली नसल्याने उबाठाने आधीचा ग्राफ काही प्रमाणात खाली आला. कोणतीही सभा, किंवा शक्ती प्रदर्शन रॅली न झाल्याने उमेदवार काहीसा नाराज झाला. प्रचार प्रसारात उबाठा मागे पडली. तर भाजपने आघाडी घेतली. 

मास व्होटींचा फायदा उबाठाला
डॉ. संचिता नगराळे (गेडाम) या नगराळे याच नावाने निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या. त्यामुळे बौद्ध, आंबेडकरी मतदारांचे मास व्होटींग उबाठाकडे गेले. त्याला मुस्लिम मतदारांनीची मोठी साथ लाभली. या एक गठ्ठा व्होटने उबाठाला जबरदस्त बुस्टिंग दिले. भाजपला देखील अनेक पॉकेट मिळाले. मात्र त्या पॉकेटची मतदार संख्या कमी होती. त्यामुळे एक गठ्ठा मतदानामध्ये शिवसेना उबाठा भाजपपेक्षा सरस ठरली.

भाजपचे विकासाचे व्हिजन
संपूर्ण निवडणुकीत भाजपने विकासाचे व्हिजन मतदारांसमोर मांडले. केंद्रात आणि राज्यात भाजपची सत्ता असल्याने वणी शहरात मोठ्या प्रमाणात विकास कामे होतील, फंड आणता येईल हा प्रचार करण्यात भाजप यशस्वी झाला. शिवाय हे केवळ पोकळ दावे नव्हते, तर भाजपकडे केलेले विकास कामे मतदारांना दाखवण्यासाठी होती. याउलट फंड नसल्याने मतदारसंघात विकास खुंटला, हे सांगण्यासही भाजप यशस्वी झाला. यामुळे अनेक मतदारांचे मतपरिवर्तन झाले. विकासाचे काय व्हिजन राहणार हे सांगण्यात भाजप सरस ठरला.

महाविकास आघाडीची वज्रमुठ 
या निवडणुकीत महाविकास आघाडीची व्रजमुठ दिसून आली. शिवसेना (उबाठा), काँग्रेस एक झाले. त्यातच त्याला मनसेची ताकद मिळाली. तिन प्रमुख पक्षाची वज्रमुठ दिसून आल्याने तिन्ही वेगवेगळ्या पक्षाचे कार्यकर्ते आणि मतदार एकत्र आलेत. तर दुसरीकडे नगरपालिका ही कार्यकत्यांची निवडणूक आहे. इच्छुक असलेला कोणताही कार्यकर्ता नाराज होऊ नये. याची काळजी भाजपने घेतली. भाजपने कुणाशीही युती केली नाही. त्याचा काही प्रमाणात भाजपला फटका बसला. तर वर्जमुठ असल्याने महाविकास आघाडीला याचा फायदा झाला.

 

भाजपला मत विभाजनाची भीती
भाजपने संपूर्ण निवडणूक काळात प्रचारात आघाडी घेतली. मात्र भाजपला निवडणुकीच्या आधी विजय चोरडिया यांच्या रुपाने मोठा झटका बसला. विजय चोरडिया यांनी भाजपनेच तिकीट नाकारलेल्या उमेदवारांना तिकीट देण्यात पहिली पसंती दिली. विजय चोरडिया यांच्या नेतृत्त्वात पहिली निवडणूक असल्याने त्यांनी साम, दाम, दंड, भेद या नितीचा वापर करत धुवांधार प्रचार केला. अर्धेअधिक उमेदवार सुपरिचित व भाजपचे असल्याने या व्होटचा मोठा फटका भाजपला बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे. याउलट महाविकास आघाडीला मतविभाजनाचा विशेष फटका बसला नाही.

या निवडणुकीच्या आधी काँग्रेस आणि शिवसेना (उबाठा) यामध्ये जागावाटपाचा तिढा निर्माण झाला. नगराध्यक्ष पद उबाठा कडे दिल्यानंतरही काँग्रेसच्या वाटेला अत्यल्प जागा आल्या. यात निष्ठावंताचे व काही चांगल्या उमेदवारांचे तिकीट कापले गेले. संजय खाडे हे धुंवाधार प्रचार आणि उत्तम नियोजनासाठी ओळखले जातात. काँग्रेसच्या काही निष्ठावंताना तिकीट नाकारल्याने तसेच अत्यल्प जागा मिळाल्याने संजय खाडे यांनी या निवडणुकीत ‘आस्ते कदम’ भूमिका घेतली. नगराध्यक्ष पदाचा काँग्रेसचा उमेदवार नसल्याने तसेच मोजक्या जागा हाती आल्याने काँग्रेसने नगराध्यक्ष ऐवजी त्यांच्या उमेदवारांकडे अधिक लक्ष दिले. याचा काही प्रमाणात नगराध्यक्षाच्या उमेदवाराला फटका बसला. दुसरीकडे भाजप मध्ये यावेळी गटतट दिसून आले नाहीत. सर्व मतभेद विसरून नेते, कार्यकर्ते एकत्र दिसून आले. याचा भाजपला फायदा झाला.

अखेर या निवडणुकीत कोणतीही लाट, हवा किंवा एकतर्फी चित्र दिसून आले नाही. भाजपने प्रचारात शिस्तबद्ध नियोजन, विकासाचे व्हिजन आणि शेवटच्या क्षणी आघाडी घेतली, तर उबाठाने सुपरिचित उमेदवार व मास व्होटींगच्या जोरावर आपली बाजू मतबूत केली. मात्र विजय चोरडिया यांच्यामुळे भाजपला मतविभाजनाचा धोका निर्माण झाला. असे अनेक अँगल असल्याने या वेळी निकाल कोणाच्या बाजूने झुकतो हे सांगणे कठीण ठरत आहे. निकाल उशिरा लागला असला तरी वणीकरांनी उत्सुकता अद्यापही कायम ठेवली आहे. कोण निवडणुकीत बाजी मारतो. याकडे सर्वांचे लक्ष लागले आहेत. (पुढल्या भागात आणखी काही बाबींचा व प्रभागाबाबत झालेल्या मतदानाचा आढावा घेऊ…) 

Comments are closed.