मांगरुळ येथे अजयवर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार

नाशिक जवळ झालेल्या ट्रॅव्हल्स दुर्घटनेत झाला होता मृत्यू

भास्कर राऊत, मारेगाव: आईला आणायला चिंतामणी ट्रॅव्हल्सने मुंबईला गेलेल्या अजयचा अपघातात मृत्यू झाला होता. त्याचा मृतदेह आज दुपारी 3 वाजताच्या सुमारास मांगरुळ येथे आणण्यात आला. त्यानंतर लगेच त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. आई व बहिणीची भेट घेऊन दिवाळीच्या आधी दोघींनाही घरी आणण्यासाठी अजय मु्ंबईला गेला होता. मात्र वाटेतच त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला.

सविस्तर वृत्त असे की शंकर उर्फ अजय मोहन कुचनकर (17) हा मांगरुळ येथील रहिवाशी होता. तो आपल्या आजी आजोबा सोबत राहायचा. गावात टाईल्स व इतर मजुरीचे काम करून तो कुटुंबाला हातभारही लावायचा. अजयची आई दुर्गा (33) ही मुंबईत एका कंपनीत काम करते. ती अजयची लहान बहिण साक्षी (14) हिच्यासह मुंबईतच राहते.

अनेक दिवसांपासून भेट नसल्याने अजयच्या आईने अजयला 1500 रुपये पाठवून मुंबईला भेटीला बोलावले होते. अजयने यवतमाळहून चिंतामणी ट्रॅव्हलची मुंबईची तिकीट काढली होती. शुक्रवारी रात्री तो यवतमाळहून मुंबईसाठी बसला होता. मात्र शनिवारी सकाळी पहाटेच्या सुमारास ट्रॅव्हल्स व ट्रकची धडक झाली. या अपघातात ट्रॅव्हल्सला आग लागल्याने 12 व्यक्तींचा होरपळून मृत्यू झाला. यात मांगरुळ येथील अजयचा देखील समावेश होता.

अपघाताची माहिती मिळताच अजयची आई व बहिण हे तात्काळ घटनास्थळी पोहोचले होते. त्यांनी मृत अजय असल्याची त्यांना खात्री पटली. उत्तरिय तपासणी करून त्याचा मृतदेह मांगरुळ येथे पाठवण्यात आला होता. आज दुपारी 3 वाजताच्या सुमारास मृतदेह मांगरुळ येथे पोहोचला. दुपारी 4.30 वाजताच्या सुमारास सर्व विधी करून त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी संपूर्ण गाव तसेच मारेगाव व परिसरातील नागरिक उपस्थित होते.

हे देखील वाचा: 

रविवारी वणीकर प्रेक्षकांनी अनुभवला थरार… एकापेक्षा एक मॅचने गाजला दिवस

काकाच्या घरी आलेल्या पुतण्याची गळफास घेऊन आत्महत्या

Comments are closed.