जंतनाशक गोळ्या घेण्यास विद्यार्थ्यांची टाळाटाळ
जागृततेचा अभाव, फायद्याबद्दल विद्यार्थी अनभिज्ञ
विलास ताजने, मेंढोली: सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने गावागावात १० ऑगस्ट हा दिवस राष्ट्रीय जंतनाशक दिन म्हणून साजरा केला जातो. याहीवर्षी या दिवसाचा दंडक पार पडला. यानिमित्ताने १ ते १९ वयोगटातील अंगणवाडी पासून शाळेत जाणाऱ्या अथवा न जाणाऱ्या सर्वांना जंतनाशक गोळ्यांचे वाटप केले जाते. मात्र सदर औषधाबद्दल विद्यार्थी आणि पालकांमध्ये जागृतता नसल्याने विध्यार्थी गोळ्या घेण्यास नकार देतात.
आरोग्य विभागाकडून गोळ्या मिळाल्या तरी बहुतांश शाळेत गोळ्याचे वाटप केले जात नाही. काही ठिकाणी गोळ्या फेकून दिल्या जातात. आरोग्य विभागाचे कर्मचारी शाळेत येऊन विध्यार्थ्यांना प्रत्यक्ष मार्गदर्शन करीत नाही. काही शाळेत परस्पर गोळ्या पाठविल्या जातात. त्यामुळे विद्यार्थी आणि पालकांमध्ये सदर औषधी बद्दल अनभिज्ञता आहे. परिणामी आरोग्य विभागाच्या मूळ उद्देशालाच खो देत असल्याचे चित्र दिसून येते.
जागतिक आरोग्य संघटनेच्या अंदाजानुसार देशात १ ते १४ वर्षे वयोगटातील किमान ६८ टक्के बालकांमध्ये आढळणारा आतड्यांचा दोष हा मातीतून प्रसारीत होतो. त्यापैकी २८ टक्के बालकांना कृमी दोषाची दाट शक्यता असते. जंतांच्या तीव्र संसर्गामुळे अतिसार, पोटदुखी, अशक्तपणा व मंदावलेली भूक, शौचास रक्त पडणे यासारखी लक्षणे दिसून येतात.
मुलांच्या आरोग्य आणि पोषणस्थितीवर जंतांचा विपरीत परिणाम होतो. म्हणून जंतूसंसर्ग रोखण्यासाठी जेवनापूर्वी, नंतर व शौचालयाचा वापर केल्यानंतर हात स्वच्छ धुवावे, पायात चपला, बूट घालावेत, निर्जंतुक स्वच्छ पाणी प्यावे, भाज्या फळे धुवावीत, नखे कापावी स्वछ ठेवावी.
जंतसंसर्गावर कोणता उपचार करावा ?
‘एलबेंडाझॉल’ ४०० मि ग्र. ही गोळी सार्वजनिक आरोग्य विभागात विनामूल्य उपलब्ध असते. १ ते २ वर्ष वयाच्या बालकांना अर्धी गोळी जेवणानंतर पूड करून पाण्यात विरघळून देणे आवश्यक असते. तर २ ते १९ वर्ष वयाच्या मुलांना पूर्ण गोळी जेवणानंतर चावून खाण्यास सांगावी त्यानंतर पाणी पिण्यास द्यावे. सदर जंतूंचा संसर्ग झाला असो किंवा नसो प्रत्येक बालक, प्रौढ व्यक्तींसाठी हे सुरक्षित औषध आहे. जगभरातील लोकांना कृमी रोगावर दिले जाते.
दुष्परिणाम झाल्यास काय करावे ?
दुष्परिणाम तात्पुरत्या स्वरूपाचे असल्याने रुग्णालयात दाखल करण्याची गरज नाही. बालकाला विश्रांती घेण्यास सांगावे. बालकाला स्वच्छ पाणी अथवा ओआएस (जलसंजीवनी) द्यावी. लक्षणे गंभीर असल्यास आरोग्य सेविका किंवा आरोग्य कर्मचाऱ्यांसी संपर्क साधावा. आजारी बालकांना औषध देऊ नये. जंतनाशकांमुळे रक्तशय कमी होतो. आरोग्य सुधारते. बालकाची वाढ होते. प्रतिकारशक्ती वाढते. यासोबतच परिसरातील जंतांची संख्या कमी होते.