आर्थिक व्यवहार करून कापसाच्या गाड्या खाली होत असल्याचा आरोप
ग्रेडर, दलाल व बाजार समितीच्या कर्मचाऱ्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान
सुशील ओझा, झरी: तालुक्यातील मुकूटबन येथील सीसीआयच्या कापूस खरेदीत मोठा घोळ होत असून गरीब शेतकऱ्यांच्या कापसाच्या गाडया न घेता दलालांच्या कापसाच्या गाड्या घेऊन भेदभाव केल्या जात आहे, असा गंभीर आरोप खुद्द बाजार समितीचे संचालक सुनिल ढाले यांनी केला आहे. गाड्या खाली करण्यात आर्थिक व्यवहार होत असून ग्रेडर, दलाल व बाजार समितीच्या कर्मचा-यांमुळे शेतक-यांचे नुकसान होत असल्याचाही आरोप त्यांनी केला आहे. खुद्द बाजार समितीचे संचालकच असे गंभीर आरोप करत असल्याचे तिथला कारभार चव्हाट्यावर आला आहे.
सरकारने शेतकऱ्यांनाच्या पिकांची नुकसान होऊ नये, त्यांच्या मालाला योग्य भाव मिळावा. याकरिता तूर चना व कापसाची खरेदी सुरू केली आहे. परंतु एक दोन दलाल व बाजार समितीचे एक दोन कर्मचारी हे स्वतःचा खरेदी केलेला कापूस ग्रेडर मार्फत लावून घेत आहे. तर शेतकऱ्यांच्या चांगल्या कापसाला रिजेक्ट केले जातोय, यासह दलालांनी परिसरातील हजारो क्विंटल कापूस खरेदी करून वेगवेगळ्या शेतकऱ्यांच्या सातबारावर टाकून सीसीआयच्या ग्रेडरला पैसे देऊन सुमार दर्जाचा कापूस ५२०० ते ५३०० रुपये क्विंटल प्रमाणे भाव लावून घेत असल्याची ओरड परिसरात होती.
१४ मे रोजी कोसारा येथील आत्माराम कडू यांची २२ क्विंटल कापसाची गाडी, वेळाबाई येथील विनोद अलाम यांचा ६७ क्विंटल कापूस व गणेशपूर येथील संतोष बेलेकार यांचा १६ क्विंटल चांगला दर्जाचा असलेला कापूस ग्रेडरने रिजेक्ट केला होता. तर कवडी असलेल्या कापसाला चांगला भाव देऊन गाडी खाली केली. यावरून तीनही शेतकरी संतापले व ग्रेडर यांना विचारणा केली असता कापूस खराब आहे घेत नाही असे उद्धट उत्तर दिले. यावरून जिनिंग मध्ये वातावरण तापले होते.
बाजार समितीच्या संचालकांना ही बाब माहिती होताच त्यांनी ‘वणी बहुगुणी’चे प्रतिनिधी यांच्या सह घटनास्थळी भेट दिली. त्यांनी कापसाची पाहणी केली असता त्यांना चांगला दर्जाचा कापूस न घेता खराब कापसाची खरेदी सुरू असल्याचे निदर्शनास आले. याबाबत संचालकांनी ग्रेडरला विचारणा केली असता कापूस खराब असल्याचे सांगुन निघून गेला. याप्रकारामुळे शेतकरी संतापले व दलाल खराब कापूस पैसे देऊन लावत असल्याचा आरोप त्यांनी केला.
शेतकऱ्यांनाचा रोष बघता संचालक सुनील ढाले यांनी शेतकऱ्यांची समस्या जाणून घेत एकदोन दलाल व बाजार समितीचे एक दोन कर्मचाऱ्यांमुळे कापूस खरेदीची वाट लागली असल्याचे मान्य केले. त्यांच्यामुळे कापूस खरेदीत घोळ चालू असून दलाल आपले पैसे काढण्याच्या उद्देशाने पैसे देऊन कापसाला भाव लावून घेत आहे. परिणामी चांगल्या कापसाला भाव मिळत नसून असा कापूस रिजेक्ट केला जात असल्याचेही त्यांनी मान्य केले. त्यांच्यामुळे कापूस खरेदी केंद्र व बाजार समिती बदनाम होत असल्याचाही त्यांनी आरोप केला.
शेतकरी नसलेल्या व्यक्तीच्या नावे कापूस?
एका दलालाने तर चक्क शेतकरी नसलेल्या व्यक्तीच्या नावाने कापूस टाकल्याची खमंग चर्चा समिती व दलालांमध्ये सुरू होती. सातबारा नसलेल्या शेतक-यांच्या नावाची गाडी सातबारा असलेल्या शेतकऱ्याच्या नावाने टाकण्यात आली व सातबारा नसलेल्याचे नाव नोंद असलेल्या शेतकर्यांचे नाव यादीतून काढून जुळवाजुळव करण्यात आले अशी चर्चा जिनिंग मध्ये सुरू होती.
ग्रेडर दलाल लोकांचा कवडी कापूस चांगला भाव देऊन जिनिंगमध्ये रात्री खाली करीत असल्याचा आरोप शेतकरी करीत आहे. तर दररोज रात्री ८ ते ९ वाजेपर्यंत कापूस गाड्या घेत असताना काल गुरूवारी 5 वाजेपर्यंतच ग्रेडरने कापूस का घेतला असा प्रश्नही शेतकरी विचारीत आहे.
दलाल आणि ग्रेडरची युती…
दलालांच्या संगतीत राहून ग्रेडरची भाषा मुजोरीची झाली असून अशा ग्रेडरला काढून नवीन ग्रेडरची नेमणूक करावी अशी मागणी शेतकर्यांकडून होत आहे. वरील तीनही शेतक-यांचा चांगला कापूस अखेर ग्रेडरने घेतला नाही व इतरही १० तंबी ते १२ गाड्या न घेता आपल्या पदाचा दुरूपयोग केला. त्यामुळे शेतकऱ्यांना चारचाकी गाडीचे दोन दिवसाचे अधिकचे भाडे अंगावर घ्यावे लागून सर्व शेतकऱ्यांना रात्रभर थांबावे लागले. असाही आरोप शेतक-यांनी केला आहे.
ग्रेडरच्या एका वर्षाचा अनुभव शेतकऱ्याकरिता घातक ठरत असून कापूस भरून असलेल्या गाडीचे भाडे दोन दिवसाचे लावत आहे तर शेतकऱ्यांना दीवसभर उपाशी रहावे लागत आहे. ज्यामुळे शेतकरी ग्रेडरच्या अश्या व्यवहारामुळे शेतकरी प्रचंड संतापले आहे.