लोकप्रियता, जनसंपर्क असूनही संजय खाडे यांचे गणित कुठे चुकले?

गणितामध्ये एक स्टेप चुकली की पुढे सर्व गणितच चुकत जाते. असेच काहीसे संजय खाडे यांच्यासोबत झाले का?

निकेश जिलठे, वणी: संजय खाडे… अल्पावधीतच मतदारसंघात प्रचंड लोकप्रियता, काँग्रेसतर्फे तिकीटसाठी सर्वात वरती नाव, उत्तम जनसंपर्क, जनहित केंद्राचा मास्टरस्ट्रोक, मीडियाचे सर्वात लाडके उमेदवार अशा सर्वच बाबतीत खाडे हे पुढे होते. जर तिकीट काँग्रेस तर्फे खाडेंना मिळाली असती निवडणूक वनसाईड झाली असती. असे अनेक तर्क वितर्कही निवडणुकीआधी लावले गेले होते. त्यांनी सांगली पॅटर्नची वणीकरांना हाक दिली. मात्र सांगली पॅटर्न सपशेल अपयशी ठरला. गणितामध्ये एक स्टेप चुकली की पुढे सर्व गणितच चुकत जाते. असेच काहीसे संजय खाडे यांच्यासोबत झाले का? लोकप्रियता, उत्तम प्रचार असूनही त्यांना केवळ साडेसात हजारांवरच मजल मारता आली. खाडे यांनी अपक्ष राहून चुकी केली का? अतिआत्मविश्वासामुळे त्यांचा राजकीय तोटा झाला आहे का? समाधानकारक मते मिळवण्यात संजय खाडे यांना अपयश का आले? याचेचे विश्लेषण आपण या भागात करणार आहोत. सुरुवात सांगली पॅटर्न पासूनच करू…

काय आहे सांगली पॅटर्न?
गेल्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे स्थानिक नेते विशाल पाटील हे काँग्रेसकडून इच्छुक, त्यांनी तशी तयारीही केली होती. मात्र सांगलीच्या जागेसाठी उध्दव ठाकरे अडून बसले. आघाडी तुटण्यापर्यंत हा वाद ताणला गेला. अखेर काँग्रेस एक पाऊल मागे आले व त्यांनी विशाल पाटील यांना आतून ताकद लावण्याचे ठरवले. पाटील यांनी बंडखोरी केली. या निवडणुकीत संपूर्ण काँग्रेस अपक्ष असलेल्या विशाल पाटलांच्या समर्थनात उतरली. पक्षाचा उमेदवार असतानाही काही प्रमाणात नाराज शिवसैनिक, राष्ट्रवादी काँग्रेस यांनी ही त्यांना साथ दिली. अपक्ष राहुनही विशाल पाटील हे एक लाखांपेक्षा अधिक मतांनी निवडून आले. याची राज्यात चांगलीच चर्चा झाली. पक्षाने आतून मदत करून अपक्षाला निवडून आणण्याच्या पॅटर्नला ‘सांगली पॅटर्न’ म्हणून प्रसिद्धी मिळाली.

विशाल पाटील यांचा पॅटर्न यशस्वी का झाला?
विशाल पाटील यांना मोठी राजकीय कौटुंबिक पार्श्वभूमी आहे. त्यांचे आजोबा दिवंगत वसंतदादा पाटील हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राहिले आहे. तर त्यांचे वडील प्रकाशबापू पाटील हे तीन वेळा सांगलीतून लोकसभा निवडणूक जिंकले आहे. विशाल पाटील यांनी आपली राजकीय सुरुवात स्वाभिमानी शेतकरी संघटनेतून केली. शेतक-यांच्या प्रश्नांसाठी त्यांनी 10 वर्ष वेळोवेळी आंदोलनं केलीत. विशाल पाटील यांनी 2019 मध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून लोकसभा निवडणूक लढली. मात्र निवडणुकीतील पराभवानंतर ते काँग्रेसमध्ये गेले. अनेक वर्षांची राजकीय कौटुंबिक पार्श्वभूमी, निवडणुकीचा अनुभव, शेतकरी आंदोलनात सक्रीय, प्रत्येक गावात जनसंपर्क ही त्यांची बलस्थानं. त्यामुळे अपक्ष उमेदवार असल्यावरही काँग्रेसचे सर्व कार्यकर्ते, नेते, विशाल पाटील यांच्या पाठिशी उभे राहिले व ते एक लाखांपेक्षा अधिक मतांनी निवडून आले.

वणीत का फेल झाला सांगली पॅटर्न?
संजय खाडे हे लोकप्रिय नेते आहे. त्यांना तिकीट नाकारल्याने सर्वसामान्यांनी नाराजी व्यक्त केली. किंबहुना तेच खरे दावेदार होते अशी देखील भावना मतदारांमध्ये होती. मात्र सांगली पॅटर्न राबवण्यासाठीची इतर यंत्रणा खाडे यांच्याकडे नव्हती. संजय खाडे हे अनेक वर्षांपासून काँग्रेसमध्ये असले तरी देखील विधानसभेच्या राजकारणात ते अवघ्या दोन वर्षाआधी सक्रिय झाले होते. त्यांना विशाल पाटील सारखी कोणतीही राजकीय कौटुंबीक पार्श्वभूमी नव्हती. विधानसभा निवडणूक लढवण्याचा त्यांना कोणताही अनुभव नव्हता. 

काँग्रेसचा पहिला दावा असताना तिकीट शिवसेनेला गेली. याचे शल्य अनेक काँग्रेस नेत्यांना व कार्यकर्त्यांना होते. खाडे यांनी देखील हाच मुद्दा उचलून निवडणुकीत उभं राहण्याचा निर्णय घेतला. काँग्रेसच्या अनेक नेत्यांनी खाडे यांना आतुन मदत करण्याचे आश्वासन दिले. मात्र ऐन वेळी हे सर्व नेते पलटले. काँग्रेसच्या काही नेत्यांनी तर खाडे यांचा राजकीय ‘गेम’ करण्यासाठी उबाठाला अधिकाधिक बळ दिले व देरकर यांचा जोमात प्रचार केला. त्यामुळे खाडे यांना एकाकी लढावे लागले.

सांगली पॅटर्न करण्यासाठी घाई?
संजय खाडे हे उद्योनमु्ख नेते आहे. त्यांनी अल्पावधीतच मतदारसंघात लोकप्रियता मिळवली. मात्र काँग्रेसमध्ये अद्यापही त्यांची सर्वमान्य नेते अशी ओळख निर्माण झाली नव्हती. झरी, मारेगाव सारख्या तालुक्यात त्यांनी अद्यापही आपले पाय मजबूत केले नव्हते. त्यामुळे काँग्रेस म्हणजे संजय खाडे हे समीकरण होऊ शकले नाही. परिणामी निवडणुकीत काँग्रेसचा उमेदवार नसतानाही खाडे यांना काँग्रेसची मतं मिळाली नाहीत. राजकारण हा लाँग टर्मचा खेळ आहे. जर पाच वर्ष संजय खाडे यांनी वाट पाहिली असती तर भविष्यात सहानुभूती, लोकप्रियता इत्यादींचा फायदा त्यांना नक्कीच झाला असता. दरम्यानच्या 5 वर्षांच्या काळात त्यांना संघटन वाढवून, पक्षात सर्वमान्य नेते अशी ओळख तयार करता आली असती. त्यानंतर सांगली पॅटर्न राबवला असता, तर कदाचित तो यशस्वी देखील झाला असता. असे देखील बोलले जात आहे.

जनाधार नसलेले नेते सोबत
माजी आमदार विश्वास नांदेकर यांनी देरकर यांना तिकीट मिळाल्याचा वचपा काढण्यासाठी खाडे यांना मदतीचे आश्वासन दिले. त्यांच्या सोबत विधानसभा क्षेत्रातील शिवसेना (उबाठा) गटाचे तिन्ही तालुका प्रमुखांनी खाडे यांच्या सोबत राहण्याच निर्णय घेतला. यासह मारेगाव तालुक्यातून नरेंद्र पाटील व गौरीशंकर खुराणा यांनी खाडे यांची साथ दिली. वणी येथील काही स्थानिक नेते खाडे यांच्या पाठिशी होते. मात्र यातील अनेक नेत्यांकडे पद असले, त्यांची वैयक्तिक ताकद असली, तरी त्यांच्या मागे दुस-या उमेदवारांना मदत करावी, असा जनाधार नव्हता. त्यामुळे हे नेते केवळ रॅली व प्रचार सभेपुरते मर्यादित ठरले. मतदानामध्ये सहका-यांची मदत कुठेही दिसून आली नाही.

स्विंग मतदानाचा मोठा फटका
सुरुवातीच्या काळात खाडे यांच्या मागे जनाधार आणि सहानुभूती अधिक होती. मात्र जसजशी मतदानाची तारीख जवळ आली जनाधार, सहानुभूती कमी होत गेली. मतदानाच्या एक ते दोन दिवस आधी मतदार कुणाला मत द्यायचे हे निश्चित करतो. संजय खाडे हे अपक्ष उमेदवार होते. त्यांची निवडून येण्याची खात्री कमी वाटल्याने अखेरच्या दिवशी मोठ्या संख्येने खाडे यांचे मत स्विंग झाले. ते मतदान देरकर यांच्याकडे वळले. त्याचा मोठा फटका खाडे यांना बसला.

जनहित केंद्र व लोकहिताच्या कामाचा फायदा नाही
संजय खाडे यांचे जनहित केंद्र हे मास्टरस्ट्रोक ठरले होते. अनेक रखडलेले कामे याद्वारे झालीत. याशिवाय हजारो लोकांना खाडे यांनी विविध प्रकारे मदत केली. अनेक लोकहिताची कामे केलीत. त्यांनी अभ्यासिका काढून तरुणांची फौज आपल्या पाठिशी उभी केली. विविध धार्मिक संस्था, संघटनांना त्यांनी वेळोवेळी मदत केली. मात्र हे सर्व कार्य त्यांच्या इमेज बिल्डिंग व लोकप्रियता मिळवण्यासाठी कामात आली. निवडणुकीच्या वेळी ना जनहित केंद्राचा त्यांना फायदा झाला, शिवाय विविध मदत केलेल्या संघटना, गृप हे देखील त्यांच्या पाठिशी उभे राहिले नाही.

ताईंनी केला ‘भाऊं’चा गेम !
वरोरा येथील जागा भावाला मिळण्यासाठी प्रतिभा धानोरकर आग्रही होत्या. ही जागा आधी सेनेच्या क्वोट्यात होती. त्यामुळे शिवसेनेने या जागेवर दावा ठोकला होता. मात्र ही जागा काँग्रेसतर्फे प्रवीण काकडे यांच्यासाठी खेचून आणण्यात खा. प्रतिभा धानोरकर यशस्वी ठरल्या. तिकीट न मिळाल्याने या जागेवर शिवसेनेचे मुकेश जिवतोडे यांनी बंडखोरी केली. जर मुकेश जिवतोडे यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला, तर संजय खाडे अर्ज मागे घेईल अशी अट धानोरकर यांनी टाकल्याची चर्चा वणीत रंगली होती. मात्र जिवतोडे यांनी अर्ज मागे घेतला नाही. त्यामुळेच संजय खाडे यांनी आपला अर्ज कायम ठेवला, असे बोलले जाते.

जिवतोडे यांनी जरी अर्ज मागे घेतला नसला, तरी खाडे यांनी अर्ज मागे घ्यायला हवा होता. असे संजय खाडे यांचे जवळचे सहकारी सांगतात. प्रतिभा धानोरकर यांनी स्वत:च्या फायद्यासाठी संजय खाडे यांचा वापर करून घेतला, वरो-याची जागा सेनेला सोडून वणीची जागा काँग्रेससाठी आणता आली असती, मात्र जे गेल्या विधानसभेच्या वेळी देरकर यांच्यासोबत झाले तेच आता संजय खाडे यांच्यासोबत झाले, अशी चर्चा देखील मतदारसंघात रंगली.

बोदकुरवार ऐवजी देरकर टारगेट
सर्व उमेदवारांची लढत ही आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांच्या सोबत होती. मात्र संपूर्ण निवडणुकीत खाडे यांच्या प्रचाराचा रोख हा देरकरांवर होता. बोदकुरवार यांच्या विरोधात सौम्य तर देरकर यांच्या विरोधात कठोर प्रचार खाडे यांनी केला. मात्र बोदकुरवार यांच्याबाबत खाडे यांची भूमिका सौम्य असल्याचे लक्षात आल्याने विविध शंका कुशंकांना उधाण आले. तर देरकर यांच्याबाबत आक्रमक भूमिका घेतल्याचे अनेक कुणबी किंवा इतर मतदारांना आवडली नाही. त्याचाही मोठा फटका खाडे यांना बसला.

(रेग्लुलर बातमी व अपडेटसाठी खालील लिंकवर क्लिक करून वणी बहुगुणीचा फेसबूक गृप जॉइन करा.. )

https://www.facebook.com/groups/241871233000964

पक्षातील बेईमान, गद्दारांना सोडणार नाही, बोदकुरवार यांची गर्जना

लोकप्रियता, विकासकामे, लाडकी बहिण.. तरी का झाला भाजपचा पराभव?

का झाला देरकर यांचा विजय सोप्पा…. DMK फॅक्टर ठरला वरदान…

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Comments are closed.