डॉ. बाबासाहेब आंबेडकर वाचनालय कधी सुरु होणार?

6 डिसेंबर पासून आमरण उपोषणाचा इशारा

पुरुषोत्तम नवघरे, वणी: वणी नगर पालिका हद्दीत येणारे डॉ. बाबासाहेब आंबेडकर वाचनालय हे नगर पालिकेच्या हलगर्जीपणामुळे बंद अवस्थेत आहे. त्यामुळे याबाबत नाराजी व्यक्त केली जात आहे. वाचनालय गेट बाहेर असलेले अतिक्रमण काढण्यात यावे व वाचनालय त्वरित सुरु करावे, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. जर येत्या आठ दिवसात वाचनालय सुरु झाले नाही तर 6 डिसेंबर पासून आमरण उपोषण करण्यात येईल, अशा इशारा निवेदनातून देण्यात आला आहे. वणीतील सामाजिक क्षेत्रात व आंबेडकरी चळवळीत कार्यरत कार्यकर्त्यांनी हे निवेदन दिले आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर वाचनालय हे कमानीजवळ असून अनेक वर्ष हे वाचनालय सुरू होते. मात्र गेल्या काही वर्षांपासून हे वाचनालय बंद अवस्थेत आहे. प्रशासनाने दुर्लक्ष केल्यामुळे वाचनालय बंद झाले आहे. त्यामुळे वाचन प्रेमीमध्ये याबाबत नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. वाचनालयाची रंगरंगोटी व साफसफाई करण्यात यावी व कायमस्वरुपी त्या वाचनालयाला पूर्ववत लोकांसाठी खुले करण्यात यावे. अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.

या प्रकरणी पालिका प्रशासनाने दुर्लक्षी केल्यास व कुठलाही कायदा सुव्यवस्थेत अडथळा निर्माण झाला याकरीता पालिका प्रशासन जबाबदार राहील, असा इशारा देखील निवेदनातून देण्यात आला आहे. निवेदन देते वेळी बबलू मेश्राम, प्रविण खान‌झोडे, धीरज पाते, रवींद्र कांबळे, किशोर मुन, पी के टोंगे, महेश टिपले, गजानन आत्राम, शेख मोहंमद, अल कमल, अजय खोब्रागडे, सचिन टिपले, सूरज उपरे दादाजी देठे इत्यादींची उपस्थिती होती.

Comments are closed.