पुरातनकालीन पांदण रस्त्यावर अतिक्रमण

शेतकऱ्यांचा मार्ग बंद तहसीलदारांकडे तक्रार

0
सुशील ओझा, झरी: तालुक्यातील अडेगाव ते मुकुटबन हा पुरातन कालीन पांदण रस्ता आहे. या रस्त्याने अडेगाव येथील ३० ते ४० शेतकऱ्यांची शेती असून, शेतात जाण्याकरिता याच रस्त्याचा वापर केला जात आहे. परंतु गेल्या काही वषांर्पासून शेतमालकांनी अतिक्रमण करून ताब्यात घेतली आहे. यामुळे शेतकऱ्यांना शेतात जाण्याकरिता मोठी अडचण निर्माण झाली आहे.
नुकतेच दोन दिवस सतत पाऊस आल्याने संपूर्ण रस्त्यावर पाणी साचले. त्यामुळे रस्ता चिखलमय झाला आहे. या मार्गावर अतिक्रमण करण्यात आले आहे. परिणामी, रस्त्यावरील साचलेले पाणी आजू बाजूच्या शेतात घुसत असून, शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे.
या रस्त्याने अडेगावतील तलावाचे सांडपाणी येत आहे. पावसाळ्यात पाऊस अधिक आल्यास रस्त्यावर ८ ते १० फूट पाणी राहते. त्यामुळे शेतकऱ्यांसह शेतमजुरांना जीव मुठीत धरून येणे-जाणे करावे लागते. पांदण रस्ता खुला करून देण्याची तक्रार शेतकऱ्यांनी केली आहे.
सदर पांदण रस्त्याबाबत शेतकरी संभाजी किसन पारखी यांनी तहसीलदार ते उपविभागीय अधिकारी पांढरकवडा यांच्याकडे वेळोवेळी तक्रारी केल्या. सदर पांदण रस्ता मोकळा करण्याचे आदेशही पारीत करण्यात आले. परंतु वर्ष उलटूनही रस्ता खुला करण्यात आला नाही. मंडळ अधिकारी, तलाठी व भूमिअभिलेख कार्यालयाचे कर्मचारी आले; परंतु त्यांच्याजवळ जागा मोजण्याची किंवा खुणा करण्याची कोणतेही साहित्य नव्हते.
पावसाच्या पाण्यामुळे शेतकऱ्यांच्या जीवाला धोका निर्माण होऊन कोणतीही दुर्घटना घडू शकते, त्यामुळे रस्ता मोकळा करावा अन्यथा, सर्व शेतकरी उपोषण करू, असा इशारा देण्यात आला आहे. यावेळी संभाजी पारखी, दत्ता दुदुले, विजय ठेंगणे, बाबाराव घाटे, वसंता घाटे, शंकर ठेंगणे, मुरलीधर घाटे, एकनाथ ठावरी, देविदास तुंबडे, भारत पिंपळशेंडे, जीवन ठेंगणे, संतोष पिंपळशेंडे, मारोती पिंपळशेंडे, विठ्ठल पिंपळशेंडे, नथ्थू डोहे, मारोती घाटे, शंकर घाटे, रवींद्र किन्हेकार, राहुल किन्हेकार, केशव पिंपळशेंडे आदी उपस्थित होते.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Leave A Reply

Your email address will not be published.