अंगणवाडी सेविका, मदतनीस निवडी ठरली वादळी

प्रकरण आले हातघाईवर, पोलिसांमुळे परिस्थिती आटोक्यात

भास्कर राऊत, मारेगाव: अंगणवाडी सेविका व मदतनीस निवडीवरून घेण्यात आलेल्या ग्रामसभेमध्ये अभूतपूर्व गोंधळ पाहायला मिळाला. हा गोंधळ इतका वाढला की प्रकरण हातघाईवर आले. दरम्यान परिस्थिती चिघळू नये म्हणून पोलिसांची मदत घेण्यात आली. मात्र तरी देखील कुणीही माघार घ्यायला तयार नसल्याने अखेर ग्रामसभेचे बहुमताने ठराव संमत केला व अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांची निवड जाहीर केली.

मारेगाव तालुक्यातील भालेवाडी, धामणी आणि मदनापूर येथील आंगणवाडी सेविका तसेच मदतनीस यांच्या नियुक्त्या होणे बाकी होत्या. भालेवाडी, धामणी आणि मदनापूर ही गट ग्रामपंचायत असून ही गट ग्रामपंचायत पेसा अंतर्गत येते. त्यामुळे जुन्या शासन निर्णयानुसार जी ग्रामपंचायत पेसा अंतर्गत येते त्या गावातील सेविका किंवा मदतनीस यांची निवड करताना ग्रामसभेच्या ठरावानुसार आणि बहुमताने ही निवड केली जाते.

दि. 13 ऑक्टोबरला सकाळी 11 वाजता ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते. सभा सकाळी 11 वाजता मदनापूर येथील जी.प.शाळेमध्ये सुरुवात झाली. सभेच्या अध्यक्षस्थानी गावातील प्रतिष्ठित बळीराम आत्राम हे होते. यावेळी सरपंच सुरेखा चिकराम आणि ग्रामसेवक ए. ए. रामटेके तसेच ग्रामपंचायत सदस्य आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी सर्वसंमतीने उमेदवारांची निवड करण्याचा प्रयत्न करण्यात आला. परंतु यामधून कोणीही माघार घ्यायला तयार नसल्याने शेवटी प्रकरण हातघाईवर आले.

यात एकमेकांना शिवीगाळ तसेच प्रकरण कॉलर पकडण्यापर्यंत आल्याने शेवटी पोलीस प्रशासन आणि पंचायत समितीला कळविण्यात आले. पोलीस विभागातर्फे तिघा जणांना शांततेसाठी पाठविण्यात आले. तर पंचायत समितीतर्फे विस्तार अधिकारी देवानंद मुनेश्वर आणि आय.सी.डी. एस. चे विस्तार अधिकारी डी. एम. कळमकर यांना या वादळी सभेसाठी पाठविण्यात आले.

त्यांनीही सुरुवातीला सामंजस्याने हा वाद मिटविण्याचा प्रयत्न केला पण त्यांना यात अपयश आले. शेवटी त्यांनी बहुमताच्या जोरावर निवड करण्याचे ठरविले. त्यानुसार आवाजी मतदानाने निर्णय घेण्यात आला. यात भालेवाडी येथील सेविका म्हणून कोमल दिलीप माफुर, धामणी मदतनीस म्हणून प्रिया कालिदास राजूरकर आणि मदनापूर येथील मदतनीस म्हणून मनीषा अविनाश किन्नाके यांची बहुमताने निवड करण्यात आली.

सकाळी 11 वाजता वादळानेच सुरू झालेली ही सभा अखेर 4.45 वाजता वादळानेच ही सभा संपली. पोलीस हस्तक्षेपामुळे शेवटी अनर्थ टळला मात्र शासनाच्या या नियमांमुळे गावांमध्ये मात्र अशांतता निर्माण होत आहेत एवढे मात्र नक्की.

हे देखील वाचा:

आझाद इलेक्ट्रॉनिक्समध्ये ‘दसरा धमाका’ ऑफर लॉन्च

मयूर मार्केटिंगमध्ये दस-यानिमित्त महासेल

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Comments are closed.