जगाच्या पोशिंद्यांसाठी एक दिवसीय अन्नत्याग आंदोलन
वणी/विवेक तोटेवार: वणीतील तहसील चौकात सोमवारी सकाळी शेतकरी आत्महत्येच्या 32 व्या स्मृतीदिनी सरसकट कर्जमाफी करिता अखिल भारतीय किसान सभा व सुकानू समितीच्या वतीने एक दिवशीय अन्नत्याग आंदोलन करण्यात आले. शासनाच्या शेतकरी विरोधी धोरणाचा निषेध करण्यासाठी आणि शेतकऱ्यांचा संघर्ष अधिक तीव्र करून बळीराजाला न्याय मिळवून देण्यासाठी सदर आंदोलन करण्यात आलं. तसंच एसडीओंना विविध मागण्यांसाठी निवेदन देण्यात आलं.
भारतातील सर्वप्रथम शेतकऱ्याची आत्महत्या ही 19 मार्च 1986 ला झाली. पवनार आश्रमाजवळ साहेबराव करपे या तरुण शेतकऱ्याने किरायच्या घरात दोन मुले, दोन मुली व पत्नी यांच्या समवेत आत्महत्या केली होती. कर्जबाजारीपणा, बँकेचे व सावकाराचे शोषण, सततची नापिकी याला कंटाळून त्यांनी आत्महत्या केली होती. त्या आत्महातेला आज 32 वर्ष पूर्ण होत आहे. ही शेतक-याची पहिली आत्महत्या मानली जाते.
बळीराजला संपूर्ण कर्जमाफीचे शासनाने लेखी आश्वासन दिले परंतु त्याची हमी काय?असा प्रश्न उपस्थित करत जनआंदोलनाचे सातत्य हाच एक पर्याय म्हणत मुख्यमंत्री यांना उपविभागीय अधिकारी वणी यांचे मार्फत निवेदन देण्यात आले आहे. शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी, शेतमालाला दीडपट भाव, स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशी मान्य कराव्या, शेतकरी शेतमजुर पेन्शन कायदा लागू करावा, शेती साहित्यावरील जीएसटी रद्द करावा, सिंचनाकरिता मोफत वीज, 4 टक्के व्याजाने पीक कर्ज, गारपीट व बोण्ड अळीची नुकसान भरपाई, कृषी पंपाची वीज बिल माफी, पेन्शन व्यवस्थेत बदल, श्रावणबाळ व संजय गांधी निराधार योजनेच्या अनुदानात वाढ करण्यात यावी अशा प्रमुख मागण्या निवेदनातून करण्यात आल्या.
सदर आंदोलनाचे नेतृत्व दिलीप परचाके, मनोज काळे यांनी केले. तर आंदोलनाला ऋषी उलमाले, शिवशंकर बांदूरकर, अनिल घाटे, भास्कर भगत, पांडुरंग पिंपळशेंडे, भारत गेडाम, प्रकाश लेंडे, सुधारकर तुराणकर, किशोर खंडाळकर, बंडू बोबडे, मारोती तेलंग, गुलाब शेंडे, दशरथ येणगंटीवार, शारदा गेडाम यांच्यासह किसान सभा आणि सुकानू समितीचे कार्यकर्ते सहभागी होते.
लिंकवर क्लिक करून पाहा व्हिडीओ….