शुक्रवारी बाजार समिती बंद, नियमनमुक्तीच्या विरोधात 1 दिवशीय संप…
पहाटे 5 वाजेपासून 12 वाजेपर्यत चालणार संप....
जब्बार चीनी, वणी: केंद्र सरकारने नुकताच बाजार समिती नियमनमुक्तीबाबत निर्णय़ घेऊन अध्यादेश काढला आहे. त्या विरोधात शुक्रवारी दिनांक 21 ऑगस्ट रोजी एका दिवसाचा लाक्षणिक संप पुकारण्यात आला आहे. त्यामुळे उद्या पहाटे 5 वाजेपासून ते रात्री 12 पर्यंत बाजार समिती बंद ठेवण्यात येणार आहे. केंद्राच्या समिती नियमनमुक्तीच्या निर्णयामुळे बाजार समित्यांचा उत्पन्नाचा स्त्रोत बंद होणार असून कर्मचा-यांच्या वेतनासरह इतरही समस्या निर्माण होणार आहे. त्यामुळे हा संप घेण्यात येणार असून यात कृषी उत्पन्न बाजार समितीशी संबंधीत सर्व घटक सामिल होत असल्याची माहिती कृषी उत्पन्न बाजार समिती वणीचे सभापती संतोष कुचनकर यांनी दिली. हा निर्णय़ रद्द करावा यासाठी बाजार समितीद्वारा प्रशासनाला निवेदनही देण्यात आले.
केंद्र सरकारने कृषी उत्पन्न बाजार समिती नियमनमुक्त करण्याचा आदेश काढला आहे. यात शेतकरी बाजार समितीच्या बाहेर देशात कोठेही त्यांचा शेतमाल विक्री करू शकतो. या निर्णयामुळे कृषी उत्पन्न बाजार समितीचे मोठे आर्थिक नुकसान होणार आहे. बाजार समितीला खरेदी विक्रीच्या माध्यमातून मार्केट फी मिळते त्यावर पाणी फिरणार आहे. याशिवाय बाजार समितीमध्ये शेतकरी, व्यापारी, अडते, हमाल, मापाडी या सर्वांवर समितीचे नियंत्रण असल्याने शेतक-यांच्या मालाला योग्य भाव व रक्कम मिळण्याची हमी असते. मात्र केंद्राच्या या निर्णयामुळे शेतक-यांना मोठा तोटा सहन करावा लागू शकतो.
शेतक-यांना अनेक सुविधा दिल्या जातात. मात्र बाजार समितीच्या बाहेर होणारे व्यवहार शेतक-यांच्या सुरक्षिततेचे राहणार नाही. त्यामुळे बाजार समिती नियमनमुक्तीचा निर्णय़ शेतक-यांच्या फायद्याचा नाही. शिवाय यात बाजार समितीच्या अस्तित्वावर कु-हाड चालवली जाणार आहे.
बाजार समिती मोडीत काढून शेतक-यांचे भले होणार नाही. मुळात केंद्राने हा अध्यादेश काढण्याआधी राज्याला गृहित धरलेले नाही. हा अध्यादेश लागू झाल्याने शेतक-यांच्या शेतमालाची हमी कोण घेणार? त्यांचा भाव कोण ठरवणार? तसेच शेतमालाची रक्कम मिळाली नाही तर त्याला जबाबदार कोण राहणार असे अऩेक प्रश्न नियमनमुक्तीच्या अध्यादेशामुळे उपस्थित होतात. त्यामुळे केंद्राने या निर्णयाचा पुनर्विचार करणे गरजेचे आहे. या अध्यादेशाच्या विरोधात उद्या शुक्रवारी एका दिवसाचा संप पुकारण्यात आला आहे. त्यामुळे उद्या पहाटे 5 ते रात्री 12 पर्यंत बाजर समितीचे काम बंद ठेवण्यात येत आहे.
– संतोष कुचनकर, सभापती कृ. उ. बा. स.
शुक्रवारी होणा-या संपात बाजार समितीच्या सर्व घटकांनी सहभागी व्हावे असे आवाहन कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती संतोष कुचनकर, सचिव अशोक झाडे, प्र. मु. मिलमिले, स म बडघरे, ते आ बोढे, प्रे भा धानोरकर, सुलोचना कातकडे यांनी केले आहे.