कृषी उत्पन्न बाजार समिती प्रवेशद्वाराला जगन्नाथ महाराजांचे नाव द्या
महिलांचे निवेदन, हजारोंच्या संख्येने मोर्चा काढणार
रवि ढुमणे, वणी: वणी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रवेशद्वारालाला नाव देण्यासाठी बऱ्याच प्रमाणात राजकारण व्हायला सुरुवात झाली होती. परंतु परिसरातील जनतेच्या भावनांचा विचार करीत संचालक मंडळाने निर्णय घेत प्रवेशद्वाराला जगन्नाथ महाराजांचे नाव दिले होते. एकीकडे स्थानिक आमदार सत्तेचा पुरेपूर वापर करीत विरोधात दंड थोपटून उभे आहेत. तर परिसराचे आराध्य दैवत असलेल्या सद्गुरू जगन्नाथ महाराजांचे नाव बाजार समितीला देण्यासाठी कुणबी समाजाच्या महिला मैदानात उतरल्या आहेत. प्रवेशद्वाराला जगन्नाथ महाराजांचे नाव देण्याच्या मागणीसाठी आता महिलानी उपविभागीय अधिकारी यांना निवेदन सादर केले आहे.
वणी कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक मंडळ बरखास्त करण्याची मागणी करीत शासन स्तरावर राजकीय फिल्डिंग लावीत येथील आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांनी संचालक मंडळाच्या मागे जणू काही तगादा लावला असल्याची चित्र दिसायला लागले आहे. वणी परिसरातील जनतेचे श्रद्धास्थान असलेल्या सद्गुरू जगन्नाथ महाराजांचे वणी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रवेशद्वाराला नाव देण्याचा निर्णय बाजार समितीच्या वतीने घेण्यात आला होता. मात्र विद्यमान आमदारांनी यात खोडा घालीत सहायक निबंधकाना सूचना करीत सदर नाव फलक काढण्याचा सूचना केल्या होत्या. केवळ राजकारण करीत आमदार सत्तेचा दुरुपयोग करीत असल्याचा आरोप सुद्धा केला जात आहे.
जगन्नाथ महाराजांच्या नावाला विरोध करीत लावलेला फलक काढण्याच्या सूचना करणे, बाजार समितीच्या शेतकरी हिताचे निर्णय घेणाऱ्या संचालक मंडळाच्या तक्रारी करून केवळ खाजगी व्यापाऱ्यांचे हित जोपासणे इतकेच कार्य आमदारांना उरले आहे. परिसरातील जनतेच्या भावनांचा विचार न करता परिसराचे श्रद्धास्थान असलेल्या जगन्नाथ महाराज प्रवेशद्वारचा फलक काढायला लावल्याने कुणबी समाजातील महिलांनी एल्गार पुकारत कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रवेद्वाराला जगन्नाथ महाराजांचे नाव द्या अशी मागणी लावून धरली.
जगन्नाथ महाराजांच्या नावाचा फलक न लावल्यास मोठ्या संख्येने आंदोलन करण्याचा इशारा कुणबी समाजाच्या महिलांनी दिला आहे. यावेळी आमदाराप्रती महिलांमध्ये प्रचंड रोष बघायला मिळाला. विकासकामांना चालना देण्याऐवजी केवळ तक्रारी करीत राजकारण करण्याकडे आमदारांचा ओढा आहे हे बाजार समितीच्या प्रकरणावरून लक्षात येते.
खाजगी बाजार समितीची पाठराखण करणे शेतकरी हितासाठी प्रयत्न करण्याऐवजी खाजगी बाजार समितीला पाठबळ देणे, इतकेच नव्हे तर जिल्हा परिषद सदस्यांच्या फंडातील विकास कामाचे केवळ उदघाटन करणे इतकेच कामे सुरू आहे. मात्र परिसरातील समस्या जैसे थेच आहे.