गजानन कासावार यांची विद्यापीठाच्या सिनेटवर नियुक्ती

पुरुषोत्तम नवघरे, वणी: येथील न.पा. शाळा क्रमांक 5 चे मुख्याध्यापक गजानन तुकाराम कासावार यांची अमरावती विद्यापीठावर सिनेट सदस्य म्हणून नियुक्ती झाली आहे. राज्यपाल नियुक्त सदस्यांमध्ये त्यांची निवड करण्यात आली आहे. पुढील पाच वर्षांसाठी ही नियुक्ती आहे. गजानन कासावार हे शैक्षणिक कार्यासह ते पत्रकारही आहेत. शिवाय विविध सामाजिक कार्यातही ते सहभागी असतात. त्यांच्या निवडीचे सर्व स्तरातून स्वागत होत आहे.

गजानन कासावार हे विद्यार्थी जीवनापासून अखिल भारतीय विद्यार्थी परिषद या विद्यार्थी संघटनेचे सक्रिय कार्यकर्ते आहेत. ते एक उत्कृष्ठ अध्यापक म्हणून ओळखले जातात. ते विविध सामाजिक व शैक्षणिक संघटनामध्ये सक्रिय सहभागी आहेत. सावित्रीबाई फुले दत्तक पालक समितीच्या माध्यमातून सन 2001 पासून आर्थिक दृष्टीने मागास 300 ते 325 मुलींना शैक्षणिक दृष्ट्या समाज सहभागातून दत्तक घेऊन दरवर्षी शैक्षणिक साहित्याचे पालकांच्या हस्ते वाटप करीत असतात.

ते विदर्भ साहित्य संघाचे स्थानिक उपाध्यक्ष आहेत. भारतीय शिक्षण मंडळात विदर्भ प्रांताचे प्रकाशन सह प्रमुख आहेत. विदर्भ नगर परिषद शिक्षक संघटनेचे ते केंद्रीय कार्याध्यक्ष आहेत. येथील नगर वाचनालायत सचिव या नात्याने मागील 15 वर्षांपासून विविध उपक्रम राबवित असतात. 2001 मध्ये त्यांना बाळशास्त्री जांभेकर पुरस्कार सुद्धा मिळालेला आहे. ते विविध वृत्तपत्रातून लिखाण करीत असतात. वणी येथे संपन्न झालेल्या विदर्भ साहित्य संमेलनानिमित्त निघालेली स्मरणिकेचे त्यांनी संपादन केले आहे.

Comments are closed.