सुशील ओझा, झरी: गेल्या तीन दिवसांपासून मुकुटबन येथील आरसीसीपीएल या सिमेन्ट कंपनीतील हजारो मजूर पायीच घराकडे निघाले. यात झारखंड आणि बिहार येथील मजुरांचा मोठ्या प्रमाणात समावेश आहे. कंपनीने वा-यावर सोडल्याचा आरोप करत मजुरांनी मुकुटबन सोडले. दरम्यान औरंगाबाद जवळ रेल्वे अपघातात काही मजुरांचा जीव गेल्यावर मात्र कंपनीला जाग आली व कंपनीतर्फे ट्रॅव्हल्सची व्यवस्था करण्यात आली आहे.
कामगारांना सोडण्यासाठी ८ व ९ मे रोजी दोन ट्रॅव्हल्स व तीन क्रुझर गाडी करण्यात आल्या. या गाड्यांद्वारा सुमारे १०० मजुरांना बडने-याला सोडून देण्यात येणार आहे. मजुरांच्या या प्रश्नाबाबत ‘वणी बहुगुणी’ने वेळोवेळी पाठपुरावा केला होता. मजुरांना गाडीत बसवते वेळी तहसीलदार गिरीश जोशी, नायब तहसीलदार रामचंद्र खिरेकर, ठाणेदार धर्मा सोनुने, मंडळ अधिकारी येरावर, तलाठी राणे व कंपनीतील अधिकारी उपस्थित होते.
मुकूटवन येथे आरसीसीपीएल ही सिमेंट फॅक्टरी आहे. ही फॅक्टरी एशियातील ही दुस-या क्रमांकाची फॅक्टरी मानली जाते. या फॅक्टरीत अडीच ते तीन हजार मजूर काम करतात. लॉकडाऊन मुळे या फॅक्टरीचे काम ठप्प पडले होते. कंपनीत कामगार व कर्मचारी म्हणून ओरिसा, पश्चिम बंगाल, झारखंड, उत्तरप्रदेश, बिहार, तामिळनाडू, आंध्रप्रदेश, इतर राज्यातील काम करीत असून सर्वच कामगार लॉकडाऊनमुळे अडकले होते.
कंपनीने मजुरांची जबाबदारी घेण्याबाबत हात वर केले. 1 मे पासून या कामगारांचे जेवण बंद करण्यात आले होते. कंपनी व ठेकेदाराने अनेकांचे पगार दिले नसल्याचेही अनेक मजुरांनी सांगितले. स्वगृही जाण्याकरिता शेकडो कामगारांनी आपले नाव व ओळखपत्राची कागदपत्रे दिली होती. मात्र कंपनीने लक्ष न दिल्याने अखेर मजुरांनी पायीच घरी जाण्याची वाट निवडली होती. वणी बहुगुणीने या घटेनेची दखल घेत याचा वेळोवेळी पाठपुरावा केला होता.
औरंगाबाद जवळील एका रेल्वे अपघातात काही मजुरांना जीव गमवावा लागल्यानंतर कंपनी खळबळून जागी झाली व प्रशासनाच्या दबावानंतर अखेर कंपनीने मजुरांना बडनेरा येथे ट्रॅव्हल्सने सोडण्याचा निर्णय घेतला आहे. या फॅक्टरीतील अर्धेअधिक मजूर पायीच घरी गेले असले तर आणखी हजारो मजूर इथे अडकलेले आहे. केवळ काही मजुरांना सोडण्याचा दिखावा करून पुन्हा कंपनीने हात वर करू नये अशी अपेक्षा परिसरातील सुजाण नागरिक व्यक्त करीत आहे.