संगीता खटोड यांची आंदोलनकर्त्यां आशासेविकांना भेट
मागण्या मान्य न झाल्यास दिला आमरण उपोषणाचा इशारा
विवेक तोटेवार, वणी: बळीराजा पार्टीकडून विधानसभेसाठी उमेदवारी मिळालेल्या महिला उमेदवार संगीता खटोड यांनी मंगळवारी आशासेविकांना भेट देऊन त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. त्यांच्या मागण्या मान्य न झाल्यास स्वतः आमरण उपोषणाचा इशारा दिला आहे.
तीन सप्टेंबर पासून या आशासेविका संपावर आहेत. त्यांनी सरकारला अनेक विनंत्या केल्या. परंतु सरकारला काही घाम फुटला नाही. या अशा सेविका ग्रामीण भागात अत्यंत अल्प मानधनावर वैद्यकीय सेवा देत आहेत. मंगळवारी वणीच्या तहसील कार्यालयासमोर या आशा सेविका जमल्या होत्या. त्याच्यासोबत बसून या आशासेविकांचे म्हणणे सौ खटोड यांनी ऐकून घेतले. कोणत्याही परिस्थितीत त्यांना साथ देण्याचा शब्द खटोड यांनी दिला.
या आशासेविकांच्या मानधनात लवकरच वाढ करण्यात येणार असल्याचे शब्द फडणवीस सरकारने दिला होता. परंतु अद्यापही शब्द पाळला नाही. या अशा सेविकांच्या समस्या लवकरात लवकर न सोडविल्यास संगीता खटोड त्यांच्यासोबत उपोषणाला बसणार असल्याचे सांगितले. वणीप्रमाणेच मारेगाव येथील आशासेविकांना खटोड यांनी भेट देऊन त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. सरकारने जर त्यांच्या मागण्या मान्य केल्या नाही, तर स्वतः सौ खटोड त्यांच्यासोबत उपोषणाला बसणार असल्याचे सांगितले.