मतदारसंघात उमेदवारीबाबतची चर्चा जोमात

यावेळी स्थानिक उमेदवारांचा मुद्दा ऐरणीवर

0 247

बहुगुणी डेस्क, कारंजा: विधानसभेची निवडणुकीची तारीख कोणत्याही क्षणी जाहीर होऊ शकते. मात्र जागा वाटपाचा तिढा अद्याप सुटलेला नाही. युतीसाठी जागा वाटपाचा भाजपने दिलेला फॉर्मुला शिवसेनेला मान्य नसल्याने युती होणार की नाही बाबत अद्याप साशंका निर्माण झाली आहे. तर काँग्रेस आणि राष्ट्रवादीची आघाडी आधीच जाहीर झाल्याने आघाडीमध्ये फक्त तिकीट कुणाला द्यायचे याचा तिढा बाकी आहे. त्यासाठी प्रत्येक नेत्यांनी तिकीट आपल्यालाच मिळावे यासाठी फिल्डिंग लावली आहे.

वाशिम जिल्ह्यात तीन मतदारसंघ आहे. त्यातील कारंजा मानोरा मतदारसंघात सध्या भाजपचे विद्यमान आमदार राजेंद्र पाटणी यांची दावेदारी पक्की मानली जात आहे. मुख्यमंत्र्यांनी भर सभेत त्यांना कामाला लागण्याचे आदेश दिल्याने आमदार राजेंद्र पाटणीच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. तर या जागेवर शिवसेनेतर्फे माजी आमदार प्रकाश डहाके यांनी सुद्धा दावा केला आहे. सध्या युतीचा फॉर्मुला निश्चित न झाल्याने तसेच शिवसेनेने सेनाभवनमध्ये राज्यातील सर्व इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेण्यास सुरूवात केल्याने युती तुटणार असे अंदाज राजकीय विश्लेषक बांधत आहे. जर युती तुटली तर प्रकाश डहाके यांची उमेदवारी सेनेतर्फे निश्चित मानली जात आहे.

आघाडीमध्ये कारंजा मानोरा मतदारसंघावर राष्ट्रवादी काँग्रेसचा दावा आहे. मात्र माजी खासदार हरिभाऊ राठोड, अनिल राठोड.यांनीही उमेदवारीसाठी प्रयत्न सुरू केले आहेत. मात्र हा मतदारसंघ राष्ट्रवादीच्या क्वोट्यात असल्याने ही जागा काँग्रेसच्या वाटेला जाणे अशक्य समजले जात आहे. राष्ट्रवादीसाठी या जागेवरून चंद्रकांत ठाकरे व डॉ. श्याम जाधव (नाईक) यांचे नाव सध्या आघाडीवर आहे. डॉ. श्याम जाधव (नाईक) गेल्या तीन वर्षांपासून त्यांनी मतदारसंघात विविध कार्यक्रमाद्वारे जनसंपर्काचा धडाका लावला. तसेच सांगली, कोल्हापूर येथे पूरग्रस्तांना केलेल्या मदतीमुळे ते थेट शरद पवारांच्या नजरेत आले. महत्त्वाचं म्हणजे शरद पवारांनी यावेळी नवीन उमेदवारांना संधी देण्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे राष्ट्रवादीतर्फे त्यांची दावेदारी प्रबळ मानली जात आहे.

वंचित आघाडीतर्फे युसूफ पुंजानी,डॉ राम राठोड,रणजित जाधव हे उमेदवार इच्छुक आहेत. पुंजानी हे फार थोड्या मताधिक्याने पराभूत झाले होते. त्यामुळे वंचिततर्फे दावेदारी पक्की मानली जात होती. मात्र मध्यंतरी युसूफ पुंजानी हे पक्ष बदलवणार असल्याची चर्चा प्रसार माध्यमांमध्ये रंगली होती. त्यामुळे वंचितच्या कार्यकर्त्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले व डॉ राम चव्हाण, रणजित जाधव या उमेदवारांचे नाव तिकीटसाठी आघाडीवर आले. मात्र अवघ्या काही मतांनी पराभव झाल्याने वंचिततर्फे पुंजानी यांचे नाव आघाडीवर असल्याचे मानले जात आहे.

यावेळी स्थानिक उमेदवारांना संधी?
कारंजा मानोरा मतदारसंघात मतदारांच्या स्थानिक अस्मिता जाग्या झाल्याने या मतदारसंघातून स्थानिकांना उमेदवारी द्यावी असा विचार पुढे येत आहे. यावेळी ही अनेक मतदारसंघाच्या बाहेरील उमेदवारांनी या मतदारसंघात उमेदवारी मिळावी यासाठी प्रयत्न सुरू केले आहे. भाजप तर्फे आ. राजेंद्र पाटणी, युती न झाल्यास सेनेतर्फे माजी आ. प्रकाश डहाके. तर आघाडीतर्फे स्थानिक उमेदवार द्यायचा झाल्यास डॉ. श्याम जाधव यांचे नाव आघाडीवर आहे.

Comments
Loading...